मुंबई : नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्याशी संलग्न असलेले शासकीय उद्यानविद्या महाविद्यालय स्थापन करण्यास मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

संत्रा, मोसंबी फळ पिकांना फायदा

नागपूर व अमरावती विभागातील ११ जिल्ह्यांमध्ये संत्रा, मोसंबी, आंबा, लिंबू, पेरू इत्यादी व मुख्य फळ पिकांव्यतिरिक्त कमी पाण्यावर तग धरणारी आवळा, सीताफळ या फळपिकांचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर नागपूर जिल्ह्यातील फळे, भाजीपाला व फुलशेतीच्या क्षेत्रात वाढ होत आहे. त्यामुळे उद्यानविद्या महाविद्यालयाची आवश्यकता होती. महाविद्यालयामध्ये फळे, भाजीपाला, फुले तसेच, प्रक्रिया व मूल्यवर्धन या संबंधीच्या अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात येईल. त्यामुळे त्या संबंधीच्या अभ्यास व संशोधनाला चालना मिळेल, असे कृषी विभागाने म्हटले आहे.

दरवर्षी १२० विद्यार्थ्यांना प्रवेश

महाविद्यालयात दरवर्षी १२० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. या महाविद्यालयासाठी शिक्षकवर्गीय २९ पदे आणि शिक्षकेतर नियमित २२ पदे, अशी एकूण ५१ नियमित पदे मंजूर करण्यात आली आहेत. त्याचबरोबर शिक्षकवर्गीय (गट अ) (०५) आणि शिक्षकेतर (गट क) (८) व (गट ड) (२२) ची पदे आवश्यकतेनुसार कंत्राटी स्वरुपात भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. या पदांसाठी आवश्यक वेतन व अनुषंगिक खर्चासाठी १२२ कोटी ३२ लाख रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे.