मुंबई : मोसमी पावसाने काहिशी विश्रांती घेतल्यामुळे राज्यभरात खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या आहेत. मंगळवारपर्यंत राज्यात सव्वा लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. शनिवारपासून मोसमी पाऊस राज्यात जोर धरण्याची शक्यता आहे. पण, पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नयेत, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत कृषी आणि हवामान विभागाकडून खरीप पेरण्या आणि पावसाचा आढावा घेण्यात आला. जून महिन्यात राज्यात सरासरी ६५ मिमी पाऊस पडतो. मंगळवारअखेर सरासरी १८ मिमी पाऊस झाला आहे. यंदा मोसमी पाऊस राज्यात काहीसा लवकर दाखल झाला. पण, त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली आहे. शेतकऱ्यांनी मशागतची कामे पूर्ण केली आहेत. पण, पावसात खंड पडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. पुरेसा म्हणजे ८० ते ९० मिमी पाऊस आणि चांगला वाफसा आल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
शनिवारपासून मोसमी पाऊस सक्रीय ?
हवामान विभागाने शनिवार, १४ जूनपासून तळकोकणात आणि त्यानंतर आठ दिवसांत उर्वरीत राज्यात मोसमी पाऊस सक्रीय होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. शुक्रवार, शनिवारी मध्य महाराष्ट्र, दक्षिण मध्य महाराष्ट्र हवेच्या कमी दाबाची स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाची स्थिती निर्माण झाली असून, त्याची वाटचाल पश्चिम दिशेने होण्याचा अंदाज आहे. याच काळात मोसमी वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता असल्यामुळे तळकोकणात शनिवारपासून पावसाला सुरुवात होईल आणि त्यानंतर पुढील आठवडाभर उर्वरीत राज्यात चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी व्यक्त केला आहे.