मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी केला. तसेच उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्रीपदी कायम असतील, हे साऱ्या देशाला दिसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पवार यांच्या विधानामुळे आता सत्तेचा लढा विधानसभेतच होणार असल्याचे स्पष्ट झाले असून, आघाडीचे नेते संघर्षांच्या भूमिकेत असल्याचे सूचित झाले आह़े

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाचे खासदार, आमदार, तसेच मंत्री व वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले की, ‘‘सरकारकडे बहुमत आहे की नाही, ते सभागृहात सिद्ध होईल. शिवसेनेचे जे आमदार बाहेर गेले आहेत, ते परत आल्यानंतर ते शिवसेनेबरोबर राहतील.  विधानसभेत आघाडी सरकारचे बहुमत सिद्ध होईल़ ’’

अजितदादांचा दावा पवारांनी खोडला

शिवसेनेमधील संघर्षांमागे भाजप नसावा, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले होते. त्यांच्या या विधानाकडे शरद पवार यांचे लक्ष वेधले असता, शिवसेनेत फूट पाडण्यास भाजपच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावर अधिक भाष्य करताना ते म्हणाले की, अजित पवार हे स्थानिक परिस्थितीवर बोलले असतील, परंतु बाहेरची परिस्थिती त्यांना माहित नसावी. शिवसेनेचे जे आमदार गुजरात व नंतर आसाममध्ये गेले आहेत, त्यांची व्यवस्था करणारे कोण आहेत ते सर्व माझ्या परिचयाचे आहेत, असे सांगत त्यांनी अजित पवार यांचा दावा खोडून काढला. गुजरात आणि आसाममध्ये भाजपचे सरकार आहे. त्यामुळे शिवसेनेतील संघर्षांच्या मागे कोण आहे, ही वस्तुस्थिती स्पष्ट आहे. त्याचबरोबर एका राष्ट्रीय पक्षाचा आम्हाला पािठबा आहे, या एकनाथ शिंदे यांच्या विधानाची चित्रफीत प्रसारित झाली आहे. देशात काँग्रेस, भाजप, बसप, भाकप, माकप, सप व राष्ट्रवादी काँग्रेस हेच केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेले राष्ट्रीय पक्ष आहेत. आता एकनाथ शिंदे व त्यांच्या सोबतच्या आमदारांना काँग्रेस, बसप, माकप, भाकप, राष्ट्रवादी हे पक्ष मदत करतात का, असा सवाल करीत, उरलेला एकच पक्ष म्हणजे भाजपच त्यामागे आहे, असा थेट आरोप त्यांनी केला.

शिंदे यांच्याबरोबर असलेल्या आमदारांना विधानसभेत यावेच लागेल. विधान भवनाच्या प्रांगणात आल्यावर या आमदारांना आसाम किंवा गुजरातची मंडळी मार्गदर्शन करण्यासाठी नसतील, असा टोलाही पवारांनी लगावला. 

संजय राऊत यांचे समर्थन

गुवाहाटीला गेलेल्या शिवसेनेच्या आमदारांनी इथे यावे, मग महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याचा विचार केला जाईल, या शिवसेने नेते खासदार संजय राऊत यांच्या विधानाचे शरद पवार यांनी समर्थन केले. जे काही बोलायचे ते इथे येऊन बोला, असे राऊत यांचे म्हणणे आहे, असे पवार यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जे शिवसेनेचे आमदार बाहेर गेले आहेत, त्यापैकी काहीजण वेगवेगळय़ा तपास यंत्रणांच्या चौकशीमुळे तिकडे गेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे पवार यांनी सांगितले.

भुजबळांच्या बंडानंतर काय झाले..

शिवसेनेतून जे आमदार आता बाहेर गेले आहेत, ते उद्या निवडणुकीत पराभूत होतील, असे भाकित शरद पवार यांनी केले. त्यासाठी त्यांनी एकेकाळी छगन भुजबळ यांनी शिवसेनेत केलेल्या बंडाची आठवण करुन दिली. त्यावेळी भुजबळ १५-१६ आमदारांसह शिवसेनेतून बाहेर पडून काँग्रेसमध्ये आले होते. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत एकाचा अपवाद वगळता सर्व पराभूत झाले होते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांची निवडणुकीत तशीच गत होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, त्यांनी सांगितले.

सरकार वाचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न – अजित पवार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा असून, सरकार वाचविण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबरोबर आहे. तसेच आमदारांच्या निधीवाटपात पक्षपात केल्याच्या आरोपाचा त्यांनी इन्कार केला. सध्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यावर उद्धव ठाकरे मात करतील, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. सरकार टिकवण्याची जबाबदारी तिन्ही पक्षांची आहे, त्यामुळे संजय राऊत यांनी जे वक्तव्य केले त्यावर आम्हाला टीका करायची नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government will prove majority in assembly floor says sharad pawar zws
First published on: 24-06-2022 at 04:55 IST