मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेतर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याअंतर्गत, दादर येथील क्रीडा भवन येथे गुरुवारी महानगरपालिकेच्या संगीत कला अकादमीने सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.

त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाडे आणि शिवगीतांचे सादरीकरण करण्यात आले. त्या सादरीकरणाने राज्यपाल आचार्य देवव्रत प्रचंड खुष झाले. कार्यक्रमात सादर करण्यात आलेल्या शिवगीतांना दाद देत त्यांनी सर्व कलाकारांचे कौतुक केले. तसेच, महापालिकेच्या संगीत कला अकादमीला ५१ हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर केले.

दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यांनतर सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत संगीत व कला अकादमी कार्यरत आहे. महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना संगीताचे धडे शिकवण्याचे काम या अकादमीतर्फे केले जातात.

तसेच, अकादमीतर्फे विविध सांस्कृतिक स्पर्धा, कला उपक्रम, कार्यक्रम आयोजित केले जातात. दादरमध्ये शिवजयंतीनिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात अकादमीतर्फे शिवरायांचे पोवाडे आणि शिवगीते सादर करण्यात आली. त्या कार्यक्रमाला आचार्य देवव्रत उपस्थित होते.

सादरीकरण पाहिल्यानंतर देवव्रत यांनी कलाकारांवर कौतुकाचा वर्षाव करीत अकादमीसाठी ५१ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. त्यावेळी महापौर रितू तावडे, खासदार अनिल देसाई, आमदार सुनील शिंदे, महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेता किशोरी पेडणेकर, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, नगरसेविका तृष्णा विश्वासराव, उप आयुक्त (परिमंडळ २) प्रशांत सपकाळे, उप आयुक्त (विशेष) (अतिरिक्त कार्यभार) विनायक विसपुते आणि महानगरपालिका सचिव मंजिरी देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

गेट वे ऑफ इंडिया, महानगरपालिका मुख्यालयात अभिवादन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिका सभागृहातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळ्याला महापौर रितू तावडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांनतर त्यांनी भारताचे गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी ‘ए’ विभागाचे सहायक आयुक्त जयदीप मोरे आणि महानगरपालिका उप सचिव सुशील महाजन उपस्थित होते.