अध्यक्षपद निवडणुकीसाठी राज्यपालांची आता परवानगी कशी?; काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांचा सवाल

महाविकास आघाडी सरकारच्या काळात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यास परवानगी नाकारणाऱ्या राज्यपालांनी सत्ताबदल झाल्यावर निवडणुकीला लगेचच कशी मान्यता दिली, असा सवाल करीत काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्यपालांच्या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.  

BALASAHEB THORAT
बाळासाहेब थोरात (संग्रहित फोटो)

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यास परवानगी नाकारणाऱ्या राज्यपालांनी सत्ताबदल झाल्यावर निवडणुकीला लगेचच कशी मान्यता दिली, असा सवाल करीत काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्यपालांच्या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.  

महाविकास आघाडी सत्तेवर असताना काँग्रेसचे नाना पटोले हे विधानसभेचे अध्यक्ष होते. त्यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद स्वीकारले. तेव्हापासून हे पद रिक्तच राहिले. हिवाळी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी परवानगी द्यावी, अशी विनंती आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांना भेटून केली होती; परंतु त्या वेळी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसंबंधीच्या नियमातील बदलाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असल्याचे कारण देत राज्यपालांनी त्यास परवानगी नाकारली होती. मग आताही सर्वोच्च न्यायालयात ते प्रकरण असताना अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राज्यपालांनी परवानगी कशी दिली, असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी केला. लोकशाहीची आणि राज्यघटनेची थट्टा चालविली आहे, अशा शब्दांत त्यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर टीका केली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेनेचा उमेदवार रिंगणात असेल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Governor allowed president question balasaheb thorat congress ysh

Next Story
शिवसेनेतून फुटलेल्यांपैकी फक्त शिंदे यांनाच राज्य नेतृत्वाची संधी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी