मुंबई : राष्ट्रीय अग्निशमन दिनानिमित्त मंगळवारी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकभवन मुंबई येथे अग्निशमन सेवा सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुंबई अग्निशमन दल, एमआयडीसी व महाराष्ट्र अग्निशमन सेवेतील १२ अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांना राज्यपालांच्या हस्ते अग्निशमन सेवेकरिता जाहीर झालेली राष्ट्रपती पदके समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली.
अग्निशमन सेवा केवळ आग विझविण्यापुरती मर्यादित राहिलेली नसून महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा, औद्योगिक संपत्ती आणि सार्वजनिक ठिकाणांचे संरक्षण करणे ही जबाबदारी झाली आहे. स्वयंपाक वायू व रासायनिक आगी, तसेच ई-कार्स आणि इतर विद्युत उपकरणांमधील लिथियम-आयन बॅटरी मुळे आगींच्या घटना घडत आहेत. आग प्रतिबंध, शोध आणि कारणांचे विश्लेषण आदी क्षेत्रांत कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करणे अत्यावश्यक आहे. बदलत्या परिस्थितीत अग्निशमन कर्मचाऱ्यांचे कौशल्य वर्धन, प्रशिक्षण आणि पायाभूत सुविधा सातत्याने अद्ययावत करणे गरजेचे आहे, असे राज्यापाल यांनी सांगितले.
महाराष्ट्रात अग्निशमन सेवांच्या आधुनिकीकरणासाठी १५व्या वित्त आयोगांतर्गत ६१४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी शहरी तसेच ग्रामीण भागात प्रभावी अग्निसुरक्षा सेवा पुरविण्यास निश्चितच मदत करेल, असे राज्यपालांनी सांगितले. महाराष्ट्रात अग्निविज्ञान क्षेत्रातील संशोधनासाठी स्वतंत्र संस्थेची स्थापना करणे अथवा विद्यमान संस्थांचे बळकटीकरण करणे आवश्यक आहे. विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांना अग्निसुरक्षा सराव, जनजागृती मोहिमा आणि आपत्ती व्यवस्थापन उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी करून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे राज्यपाल म्हणाले.
सुरुवातीला महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालक संतोष वारिक यांनी राज्यपालांच्या जॅकेटला अग्निशमन ध्वजाचे तिकीट लावले. राज्यपालांनी अग्निशमन सेवा कर्मचारी कल्याण निधीला आपले योगदान दिले तसेच जनतेला निधीसाठी अधिकाधिक योगदान देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला मुंबई अग्निशमन दल, औद्योगिक आस्थापना तसेच महाराष्ट्र अग्निशमन सेवेतील वरिष्ठ अग्निशमन अधिकारी व पुरस्कार प्राप्त अधिकाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
मुंबई डॉकयार्ड येथे सन १९४४ साली झालेल्या जहाजावरील स्फोटात प्राण गमावलेल्या अग्निशमन अधिकारी व जवानांच्या स्मरणार्थ १४ एप्रिल हा दिवस राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिवस व सप्ताह पाळला जातो.
या अधिकाऱ्यांचा सन्मान :
राज्यपालांच्या हस्ते मुख्य अग्निशमन अधिकारी, एमआयडीसी संतोष वारिक, मुंबई अग्निशमन दलाचे उप मुख्य अग्निशमन अधिकारी अनिल परब, मुंबई अग्निशमन दलाचे उपमुख्य अग्निशमन अधिकारी हरिश्चंद्र रघु शेट्टी, विभागीय अग्निशमन अधिकारी देवेंद्र पाटील, सब ऑफिसर राजाराम कुदळे, सब ऑफिसर अनंत धोत्रे, लिडींग फायरमन किशोर म्हात्रे, लिडींग फायरमन मुरलीधर आंधळे, लिडींग फायरमन मोहन तोसकर, लिडींग फायरमन मुकेश काटे, विभागीय अग्निशमन अधिकारी किशोर घाडीगावकर व वरिष्ठ प्रशिक्षक किरण हत्याळ यांना राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले.
