अतुल लोंढे यांची मागणी

मुंबई : जम्मू काश्मीरचे राज्यपाल म्हणून कार्यरत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित एक व्यक्ती व अंबानी यांच्या फाइलला मंजुरी देण्यासाठी आपल्याला ३०० कोटींची लाच देण्याचा प्रस्ताव होता, असा गौप्यस्फोट मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला आहे. मलिक यांना कोट्यवधी रुपयांची लाच देऊ करणारी रा. स्व. संघाशी निगडित ती व्यक्ती कोण आहे? राज्यातही फडणवीस सरकारच्या काळात विविध मंत्र्यांच्या कार्यालयात नियुक्त केलेले संघाचे लोक हे वसुली आणि फायली क्लिअर करण्यासाठीच नेमले होते का? याची चौकशी महाविकास आघाडी सरकारने करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

सातत्याने भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणे आणि इतर पक्षांतील नेत्यांची बदनामी करणे ही संघ आणि भाजपची कार्यपद्धती आहे. विरोधी पक्षांतील नेत्यांवर चिखलफेक करून आपला जातीय, धर्मांध आणि भ्रष्ट चेहरा लपवण्याचे काम संघ आणि भाजपकडून सुरू असते हे किरीट सोमय्या प्रकरणातून संपूर्ण महाराष्ट्र पाहतो आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत भ्रष्टाचाराबाबत गळा फाडून ओरडणाऱ्या संघ आणि भाजपचा खरा चेहरा सत्यपाल मलिक यांनी जनतेसमोर आणला आहे. ३०० कोटी रुपयांच्या लाचेचा प्रस्ताव देणारी संघाची ती व्यक्ती कोण आहे, याचा खुलासा संघाने करावा, अशी मागणी लोंढे यांनी केली आहे.