काँग्रेस प्रवक्ते  अतुल लोंढे यांची टीका

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुलींच्या प्रगतीबाबत केलेले वक्तव्य हे निषेधार्ह असून या विधानातून त्यांच्या बुरसटलेल्या मनुवादी विचारसणीचे दर्शन होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महिलांबद्दलची चूल आणि मूल ही शिकवणच राज्यपाल महोदयांच्या मुखातून बाहेर आल्याची टीका करत राज्यपाल कोश्यारी यांनी या असंवेदनशील आणि बेजबाबदार वक्तव्याबद्दल देशातील मुली व महिलांची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली.

पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना काही मार्गदर्शन करणे अपेक्षित होते. परंतु संघाच्या शिक्षणामुळे महिलांबाबतची संघाची मते त्यांच्या बोलण्यातून बाहेर आली. मुली शिकून अशाच प्रगती करत राहिल्या तर २० ते ३० वर्षांनंतर देशात आयएएसमध्ये मुलांपेक्षा मुली जास्त संख्येने दिसतील त्यासाठी संतुलन साधण्याचे प्रयत्न करा, हे कोश्यारी यांचे विधान  बुरसटलेल्या मनुवादी पुरुषसत्ताक मानसिकतेचे लक्षण आहे, अशी टीका लोंढे यांनी केली.

शेतकऱ्यांना कमी मदत दिल्याचा आरोप करत भाजप  सरकारच्या विरोधात १ नोव्हेंबरला आंदोलन करत आहे. परंतु भाजपचा शेतकऱ्यांविषयीचा कळवळा हा  पोकळ आहे. निसर्ग चक्रीवादळाचा कोकण व गुजरातला फटका बसला असता पंतप्रधान मोदी यांनी फक्त गुजरातची हवाई पाहणी करून तात्काळ एक हजार कोटींची मदत दिली पण महाराष्ट्राकडे ढुंकूनही पाहिले नाही. शेतकऱ्यांचा खरेच कळवळा असेल तर भाजपने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांशी दुजाभाव करणाऱ्या मोदींविरोधात बोंबा माराव्यात, असे  लोंढे यांनी म्हटले आहे.