विद्यापीठ अनुदान आयोगाने सुचविलेल्या पर्यायानुसार अंतिम वर्षांसाठी ऑनलाइन म्हणजे घरबसल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याबाबत सरकारी पातळीवर विचार सुरू आहे. विद्यापीठांच्या कुलगुरूंनी  त्यांचे मत मांडल्यावर नेमकी परीक्षा कशी देता येईल याचा निर्णय घेतला जाईल. त्यानंतरच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मान्यतेने परीक्षा कधी घ्यायच्या याचे वेळापत्रक तयार केले जाईल.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पदवीच्या अंतिम वर्षांची परीक्षा घेण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने चाचपणी सुरू केली आहे. या संदर्भात राज्यपाल आणि कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारी आढावा घेतला. ३१ ऑक्टोबपर्यंत परीक्षांचे काम पूर्ण करण्यासाठी कोश्यारी यांनी परवानगी दिली. अंतिम वर्षांच्या प्रात्यक्षिक परीक्षा १५ सप्टेंबरपासून सुरू होणार असून विद्यापीठांनी अधिकार मंडळाच्या बैठका घेऊन त्याचा अहवाल दोन दिवसांत शासनाला द्यायचा आहे. या आढावा बैठकीत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, अतिरिक्त मुख्य सचिव (उच्च व तंत्रशिक्षण) राजीव जलोटा आणि कु लगुरूंच्या समितीचे अध्यक्ष व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर उपस्थित होते.

परीक्षा कशी घेता येईल याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने विविध पर्याय सुचविले आहेत. यात ऑनलाइन तसेच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष परीक्षा देण्याच्या पर्यायांचा समावेश आहे. यानुसार विद्यार्थ्यांना घरबसल्या म्हणजेच ऑनलाइन परीक्षा देण्याच्या पर्यायाला राज्यपाल कोश्यारी यांनी मान्यता दिल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. राज्याच्या ग्रामीण किंवा दुर्गम भागांत ऑनलाइन परीक्षा देणे शक्य होणार नाही. अशा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा द्यावी लागेल.

राज्यातील प्रत्येक विद्यापीठाअंतर्गत वेगळे प्रश्न आहेत. परीक्षा नक्की कशा आणि कधी घ्यायचा याबाबत सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंचा अहवाल प्राप्त झाल्यावरच विद्यापीठ अनुदान आयोगाला पत्र पाठविण्यात येईल. यामध्ये परीक्षा कशा आणि कधी घेणार याची सविस्तर माहिती आणि कालावधीचा समावेश असेल. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मान्यतेनंतरच परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल, असे उच्चपदस्थांकडून सांगण्यात आले.

अंतिम निर्णय मंगळवारी.. परीक्षा कशा आणि कधी घ्याव्यात याचा निर्णय विद्यापीठांनी अधिकार मंडळाच्या बैठकीत घ्यावा, अशीही सूचना देण्यात आली असून त्यासाठी विद्यापीठांना दोन दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. विद्यापीठांनी त्यांचे अहवाल दिल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक घेऊन मंगळवापर्यंत अंतिम निर्णय जाहीर करण्यात येईल, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

नवे प्रश्न..

बहुतांशी विद्यापीठांनी गेले पाच महिने परीक्षांची फारशी तयारी केली नाही. ऑनलाइन परीक्षा घेणे शक्य आहे का, याची चाचपणीही बहुतेक विद्यापीठांनी केलेली नाही. त्यामुळे आता अचानक पुढील दहा दिवसांमध्ये परीक्षांची तयारी होऊ शकणार का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

प्रात्यक्षिकेही घरून?प्रात्यक्षिक परीक्षांसाठीही विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये बोलवू नये अशी सूचना विद्यापीठांना दिली असल्याचे सामंत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. मात्र अशा प्रकारे घरून प्रात्यक्षिके कशी करून घ्यावीत, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ‘विद्यार्थ्यांकडून कृती, परिणाम, निष्कर्ष असे लेखी स्वरूपात घेता येऊ शकते,’ असे एका प्राचार्यानी सांगितले.

एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्याही परीक्षा?

अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या आधीच्या वर्षांत अनुत्तीर्ण झालेल्या विषयाच्या (बॅकलॉग) परीक्षाही नियमित परीक्षांबरोबरच घेण्यात येण्याचा विचार करण्यात येत आहे.