मुंबई : देशभरात झपाट्याने वाढत असलेल्या वजन कमी करण्याच्या औषधांच्या वापराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलत जीएलपी-१ वर्गातील औषधांवर नियामक देखरेख अधिक कडक केली आहे. अनियंत्रित विक्री, भ्रामक जाहिराती आणि चुकीच्या वापराच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन औषध पुरवठा साखळीवर विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुळात मधुमेह नियंत्रणासाठी विकसित करण्यात आलेली हीजीएलपी-१ औषधे अलीकडच्या काळात वजन कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहेत. भूक कमी करणे आणि शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे या गुणधर्मांमुळे या औषधांची मागणी वाढली आहे. मात्र, या वाढत्या लोकप्रियतेमुळेच त्यांचा गैरवापरही वाढत असल्याची चिंता व्यक्त होत आहे.

केंद्राच्या निर्देशानुसार, औषध नियंत्रक संस्थांनी देशभरातील घाऊक विक्रेते, किरकोळ औषध दुकाने, ऑनलाइन फार्मसी आणि वेलनेस क्लिनिक्सवर तपासण्या सुरू केल्या आहेत. विशेषतः प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधांची विक्री होत असल्याच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या जात असून अशा प्रकरणांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. सरकारने औषध कंपन्यांनाही स्पष्ट सूचना दिल्या आहेत. वजन कमी करण्यासाठी जलद परिणामांचे आश्वासन देणाऱ्या किंवा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर बंदी घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अशा प्रकारच्या प्रचारामुळे लोकांमध्ये चुकीच्या अपेक्षा निर्माण होतात आणि वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषधांचा वापर वाढतो, असे अधिकाऱ्यांचे मत आहे.

दरम्यान, काही महत्त्वाच्या औषधांच्या पेटंटची मुदत संपत आल्याने भारतीय औषध कंपन्या स्वस्त जनरिक औषधे बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत.यामुळे ही औषधे अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते यामुळे वापर वाढेल, पण त्याचबरोबर बनावट औषधे, चुकीचे डोस आणि अनधिकृत वापराचा धोका देखील वाढू शकतो. प्रामुख्याने मोठ्या शहरांमध्ये याचा वापर जास्त प्रमाणात होत असून तेथील अन्न व औषध प्रशासनाने याबाबत सतर्कता दाखवणे गरजेचे आहे. बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, अपुरी झोप, जंक फुड सेवन आदी अनेक कारणांमुळे तरुणांमध्ये वजन वाढण्याचे प्रमाण शहरी भागात वेगाने वाढत आहे. यावर जीवनशैलीतील बदल , पुरेसा व्यायाम व संतुलित आहार घेण्याऐवजी झटपट औषध घेऊन वजन घटविण्याकडे वाढलेला कल लक्षात घेऊन तशाप्रकारच्या जाहिराती केल्या जातात. यावर कडल लक्ष ठेवून कारवाई होणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. जीएलपी-१ औषधे ही केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत, अन्यथा मळमळ, उलट्या, पचनाच्या समस्या किंवा इतर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. वजन कमी करण्यासाठी औषधांवर अवलंबून राहण्याऐवजी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि आरोग्यदायी जीवनशैली यावर भर देणे अधिक सुरक्षित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.एकूणच, वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घेतलेली ही भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. या कडक देखरेखीमुळे औषधांचा गैरवापर रोखला जाईल आणि रुग्णांच्या आरोग्याचे संरक्षण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.