जिजूभाईबढेका, सरलादेवी साराभाई, ताराबाई मोडक आणि इतरांनी स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू केलेल्या पहिल्या राष्ट्रीय बालहक्क शिक्षण चळवळीचा वारसा सांगणारी ‘ग्राममंगल’ ही संस्था महाराष्ट्रात विविध ठिकाणी दुर्गम भागातील शेकडो मुलांना आनंददायी वातावरणात शिकण्याची संधी उपलब्ध करून देते. त्याचबरोबर मुख्य प्रवाहातील शिक्षणातील त्रुटी दाखवून देत पर्यायी व्यवस्थेबाबत मार्गदर्शन करणारे विद्यापीठ असाही संस्थेचा लौकिक आहे.
अर्थपूर्ण शिक्षणाचा आनंददायी ज्ञानयज्ञ!
अनुताई वाघ यांनी कोसबाड येथील आपले कार्य संपल्यानंतर डहाणू तालुक्यातील दाभोण येथे प्रा. रमेश पानसे आणि इतरांच्या सहकार्याने संस्थेचे रोपटे लावले आणि त्यापूर्वी कधीही शाळेत न गेलेल्या परिसरातील आदिवासी पाडय़ांवरील मुला-मुलींना विद्यार्थी होण्याची संधी मिळाली. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ कार्यरत असणाऱ्या ‘ग्राममंगल’ संस्थेचे विविध प्रकल्प डहाणू, विक्रमगड, पुणे, सातारा व बीड जिल्ह्य़ांत सुरू आहेत.
प्रचलित शिक्षण प्रणालीतील दोषांवर संस्थेने सुचविलेले उपाय आता सर्वमान्य होऊ लागले आहेत.
मुख्य प्रवाहातील शाळांनी तसेच शासनानेही शैक्षणिक धोरणात त्यांचा अंतर्भाव केला आहे. जिथे मुले शिक्षणाचा श्रीगणेशा करतात, त्या बालवाडय़ांवर ‘ग्राममंगल’ने अधिक लक्ष केंद्रित केले आहे.