मंगल हनवते
मुंबई : ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास करणाऱ्या ‘म्हाडा’च्या मुंबई मंडळासमोर नवा पेच निर्माण झाला आहे. या चाळीतील सुमारे १२५ घरे ग्रामस्थ मंडळांच्या ताब्यात आहेत. नियमानुसार घरांची पात्रता निश्चिती वैयक्तिक गाळेधारकाच्या नावे करण्यात येते. मात्र गा्रमस्थ मंडळांच्या नावावरील घरांची पात्रता कशी निश्चित करायची आणि पुनर्विकासात उभ्या राहणाऱ्या इमारतीतील कायमस्वरुपी घराचा ताबा नेमका कोणाला द्यायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाअंतर्गत पहिल्या टप्प्यात ना. म. जोशी मार्ग येथील रहिवाशांची पात्रता निश्चिती सुरू आहे. पात्र रहिवाशांबरोबर करार करून त्यांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात येत आहे. पात्रता निश्चिती करताना मंडळासमोर एक नवी समस्या उभी राहिली आहे. येथील ३२ इमारतींमध्ये अंदाजे १२५ घरे ही सध्या ग्रामस्थ मंडळाच्या ताब्यात आहेत. पात्रता निश्चिती करताना या घरांच्या कागदोपत्रांवर ग्रामस्थ मंडळांचे नाव दिसत नाही. यापैकी काही घरे ज्या व्यक्तीच्या नावे आहेत, ते तेथे वास्तव्यास नाहीत. त्यामुळे या घरांची पात्रता निश्चित करणे, तसेच संक्रमण शिबिराचा आणि पुढे कायमस्वरुपी घराचा ताबा नेमका कोणाला द्यायचा, असा पेच निर्माण झाला आहे.
ना. म. जोशी मार्गाच्या आसपासच्या परिसरातील गिरण्यांमध्ये काम करणारे कामगार आपल्या गावातील इतर कामगारांसह एकत्र वास्तव्यास होते. त्यावेळी पाच ते दहा गिरणी कामगार चाळीत एकत्र राहत होते. ही घरे ग्रामस्थ मंडळांच्या नावे खरेदी करण्यात आली होती. पुढे गिरण्या बंद झाल्यानंतर आजतागायत या घरांचा ताबा संबंधित ग्रामस्थ मंडळाकडेच आहे. मात्र काही घरे एखाद्या व्यक्तीच्या नावे आहेत. संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला असून त्यानंतर ही घरे त्याच्या वारसाच्या नावे करण्यात आलेली नाहीत. अशा वेळी या घरांसाठी पात्रता निश्चिती कशी करायची असा प्रश्न निर्माण झाल्याची माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या १२५ घरांची पात्रता निश्चित रखडली असून मंडळाला इमारती रिकाम्या करून काम सुरू करणेही अवघड ठरणार आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
महत्त्वाचे म्हणजे ग्रामस्थ मंडळांच्या ताब्यातील घरे ज्या व्यक्तीच्या नावे आहेत, त्याचे वारसही आता घरांवर दावा करण्यासाठी पुढे येऊ लागले आहेत. परिणामी, यावरून वादही निर्माण झाल्याची माहिती ना. म. जोशी मार्ग बीडीडी पुनर्विकास समितीचे अध्यक्ष कृष्णकांत नलगे यांनी दिली.
आज बैठक?
या संदर्भात चर्चा करण्यासाठी मंडळाने बुधवारी एक बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला स्थानिक आमदार सुनील शिंदे, बीडीडी संचालक, ग्रामस्थ मंडळ सदस्य आणि कागदोपत्री घरे नावावर असलेल्या व्यक्ती, वारस उपस्थित राहणार आहेत. मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे यांनी या बैठकीचे आयोजन केले असून या बैठकीत कोणता तोडगा काढण्यात येतो याकडे लक्ष लागले आहे.