मुंबई: पहिल्यांदाच मराठी दूरचित्रवाणीवर सुरू झालेल्या ‘इंडियन आयडॉल मराठी’ या सांगीतिक कथाबाह्य कार्यक्रमाचा पहिला विजेता लवकरच जाहीर होणार असून सोमवार, मंगळवार आणि बुधवार या दिवशी कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा होत आहे. ‘सोनी मराठी’ वाहिनीवर सुरू ‘इंडियन आयडॉल मराठी’ या कार्यक्रमातून नुकतेच महाराष्ट्राला अंतिम ५ स्पर्धक मिळाले आहेत. ‘इंडियन आयडॉल’चे संगीतकार अजय-अतुल यांनी परीक्षण केले असून येत्या बुधवारी महाराष्ट्राचा ‘इंडियन आयडॉल मराठी’चा पहिला विजेता जाहीर होणार आहे.
निफाडचा जगदीश चव्हाण आणि दिंडोरीचा प्रतीक सोळसे, पनवेलचा सागर म्हात्रे, वसईची श्वेता दांडेकर आणि नागपूरची भाग्यश्री टिकले या स्पर्धकांनी अंतिम फेरीत बाजी मारली आहे. इंडियन आयडॉल मराठी या स्पर्धेसाठी ७ ते ८ हजार गायकांनी अर्ज केले होते. त्यातून चौदा स्पर्धक अंतिम फेरीसाठी निवडले. त्यातून महाअंतिम फेरीसाठी अंतिम पाच स्पर्धकांची निवड करण्यात आली. ‘आम्ही गायन कुठेही शिकलो नाही. इतकी वर्षे आम्ही अनुभव घेतच शिकलो आणि घडलो. या नव्या मुलांना आम्ही गायनाचे धडे आमच्याच अनुभवातून देत आहोत. आमच्याकडे जे ज्ञान आहे ते त्यांना द्यायचे होते. आम्हाला जे ‘मधुर’ आमच्या गुरूंकडून घेता आले तेच आम्ही या नव्या पिढीला देतोय. परीक्षण हा खूप वेगळा भाग आहे. त्यासाठी एक वेगळी बुद्धी लागते आणि विश्लेषणात्मक वृत्ती लागते. आमचे काम समजावण्याचे आहे आणि ते आमचे कर्तव्य आहे’, असे संगीतकार अजय गोगावले म्हणाले.
सूर, ताल, उच्चार यापुढेही गायकी जायला हवी होती..
‘गायन शिकलेल्या अथवा न शिकलेल्या आपल्या मराठी मुलांची गायकी सूर, ताल, हावभाव, उच्चार छान आले इथवरच न राहता यापुढे जायला हवी. जे आम्हीही या कार्यक्रमातून साध्य करण्याचा प्रयत्न केला आणि असं काही समजावून देणारी शाळा आहे असे वाटत नाही’’, असेही ते म्हणाले.