मुंबईत रंगभूमीचा इतिहास साकारणारे भव्य संग्रहालय

राज्यपालांची घोषणा; मुंबई-शिर्डी मार्गावर साईभक्तांसाठी मूलभूत सुविधा

विधिमंडळाच्या एकदिवसीय विशेष अधिवेशनासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे बुधवारी विधिमंडळ परिसरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी स्वागत केले.  (छाया-प्रशांत नाडकर)

राज्यपालांची घोषणा; मुंबई-शिर्डी मार्गावर साईभक्तांसाठी मूलभूत सुविधा

मुंबई :  छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यासारख्या समाजसुधारकांनी घालून दिलेल्या मार्गाचे अनुसरण करत समाजातील वंचित घटकांचा विकास करण्यात येईल, अशी ग्वाही देतानाच मराठी रंगभूमी चळवळीचा इतिहास साकारणारे भव्य संग्रहालय मुंबईत उभारण्याची घोषणा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी बुधवारी विधिमंडळात केली.

विधिमंडळाच्या एक दिवसीय विशेष अधिवेशनाचा प्रारंभ राज्यपालांच्या अभिभाषणाने झाला.

राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, महिला व तळागाळातील घटकांच्या कल्याणासाठी शासन वचनबद्ध आहे. तसेच युवकांच्या सुरक्षेबरोबरच नाशिक, ठाणे, अमरावती व नागपूर येथे आदिवासी युवकांकरिता क्रीडा अकादमी सुरु करण्यात येईल. महिला सुरक्षेसाठी उपाययोजना करताना त्यांच्या संबंधातील गुन्ह्यांबाबत त्वरित व कठोर कारवाई करण्यात येईल. त्यासाठी कायद्यांमध्ये आवश्यक ती सुधारणा देखील केली जाईल, असेही कोश्यारी यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्राच्या निर्मितीचे हे साठावे वर्ष असून संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ातील हुतात्म्यांना श्रद्धाजली अर्पण करीत राज्यपाल म्हणाले, गेल्या ६० वर्षांत कृषी, उद्योग, तंत्रज्ञान, कला, क्रीडा, संगीत, शिक्षण आदी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय प्रगती राज्याने केली आहे. या कामगिरीचा सोहळा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र, कर्नाटक संबंधात राज्याने दावा केलेल्या ८६५ गावात राहणाऱ्या मराठी भाषिक जनतेच्या हक्कांचे व विशेषाधिकारांचे संरक्षण करण्याचा पुनरुच्चारही राज्यपालांनी यावेळी केला. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या या प्रकरणांमध्ये राज्य शासन सातत्याने भूमिका मांडत राहील, अशी ग्वाही राज्यपालांनी दिली.

शिवभोजन योजनेच्या माध्यमातून गरीब व गरजू व्यक्तिला केवळ १० रुपयांमध्ये चौरस आहार देण्यात येईल. बळीराजाला सहाय्य करण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेद्वारे २ लाख रुपयांपर्यंतचे थकित कर्ज माफ करण्यात येणार आहे.

ही योजना कालबद्ध रीतीने राबविण्यात येणार असून पिक कर्जाची थकीत रक्कम २ लाख रुपयांहून अधिक असलेल्या शेतकऱ्यांसाठी योजना तयार करण्यात येत असून त्यास अंतिम रुप देण्यात येत असल्याचे राज्यपालांनी  सांगितले. पीक कर्जाची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना उत्तेजन देणाऱ्या लवकर नवीन योजना जाहीर केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

राज्यातील तीर्थस्थळांचा विकास कार्यक्रम हाती घेण्यात येणार असून अनेक भाविक शिर्डी येथे पदयात्रा करतात. या यात्रेकरुंसाठी सुविधा पुरविण्याकरीता पहिल्या टप्यात मुंबई ते शिर्डी या मार्गावर शौचालय, पिण्याचे पाणी यासारख्या मुलभूत सुविधा पुरविण्यात येतील. ग्रामीण जनतेला लाभदायी असणाऱ्या विविध कल्याणकारी योजना देखील राबविण्यात येतील, असेही राज्यपालांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Grand museum for marathi drama will build in mumbai maharashtra governor bhagat singh koshyari zws

ताज्या बातम्या