मुंबई : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांकडून चालविण्यात येणाऱ्या अनुदानित वसतिगृहांतील कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार अधीक्षक, स्वयंपाकी, मदतनीस आणि चौकीदार यांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे.

अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या पुरेशा संधी उपलब्ध व्हाव्यात, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शाळा सोडण्याचे प्रमाण कमी व्हावे आणि आर्थिक अडचणींमुळे त्यांच्या शिक्षणात अडथळे येऊ नयेत, या उद्देशाने स्वयंसेवी संस्थांमार्फत राज्यात अनुदानित वसतिगृहे चालविण्यात येतात. राज्यात अशी एकूण २,३८८ वसतिगृहे असून, त्यापैकी मुलांची १,८०४ आणि मुलींची ५८४ वसतिगृहे आहेत. या वसतिगृहांची मंजूर विद्यार्थी क्षमता ९९ हजार ८५२ इतकी आहे.

या वसतिगृहांतील कर्मचाऱ्यांचे मानधन अत्यल्प असल्याने त्यात वाढ करण्याची मागणी लोकप्रतिनिधी, कर्मचारी संघटना आणि विविध संस्थांकडून सातत्याने करण्यात येत होती. यासाठी आंदोलने आणि उपोषणेही झाली होती. कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीनेही आपल्या अहवालात मानधनवाढीची शिफारस केली होती. त्यानुसार ही वाढ करण्यात येत असून मंत्रिमंडळाच्या ६ ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत या निर्णयाला मान्यता देण्यात आली आहे.

सुधारित मानधन

शासन निर्णयानुसार, महानगर क्षेत्र तसेच अ आणि ब वर्गातील महानगरपालिका क्षेत्रांतील वसतिगृह कर्मचाऱ्यांना अधिक मानधन मिळणार आहे. राज्यातील उर्वरित क्षेत्रांतील वसतिगृहांसाठी स्वतंत्र दर निश्चित करण्यात आले आहेत.

  • अधीक्षक : सध्याचे १० हजार रुपये; सुधारित मानधन महानगर क्षेत्र व अ-ब वर्गातील महानगरपालिका क्षेत्रांत २० हजार रुपये, तर उर्वरित क्षेत्रांत १५ हजार रुपये.
  • स्वयंपाकी : सध्याचे ८,५०० रुपये; सुधारित मानधन अनुक्रमे १७ हजार आणि उर्वरित क्षेत्र १२ हजार रुपये.
  • मदतनीस : सध्याचे ७,५०० रुपये; सुधारित मानधन अनुक्रमे १५ हजार आणि उर्वरित क्षेत्र १० हजार रुपये.
  • चौकीदार : सध्याचे ७,५०० रुपये; सुधारित मानधन अनुक्रमे १५ हजार आणि उर्वरित क्षेत्र १० हजार रुपये.

मुलींच्या वसतिगृहांसाठी विशेष तरतूद

मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या अनुदानित वसतिगृहांमध्ये महिला अधीक्षक आणि २४ तास पहारेकरी असणे बंधनकारक करण्यात आले आहे वित्त विभागाच्या सहमतीने आणि मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने हा निर्णय जारी केला आहे.