मुंबई : ग्रॅन्ट रोड नाना चौक येथे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) बांधलेला अंडाकृती स्कायवॉक मुंबई महापालिकेसाठी पांढरा हत्ती ठरू लागला आहे. वापरात नसलेल्या या स्कायवॉकचा वापर वाढावा म्हणून मुंबई महापालिका आता या स्कायवॉकला सरकते जिने बसवले जातील. त्यासाठी सुमारे सव्वाचार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. कोट्यवधी रुपये खर्च केल्यानंतर तरी हा स्कायवॉक वापरला जाणार का याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

ग्रॅन्ट रोडमधील नाना चौकातील अंडाकृती आकाशमार्गिकेचा (स्कायवॉकचा) पादचाऱ्यांनी जास्तीत जास्त वापर करावा म्हणून पालिका आता यावर कोट्यवधी रुपये खर्च करणार आहे. या स्कायवॉकला दोन सरकते जिने बसवण्यात येणार असून याकरीता पालिका तब्बल सव्वाचार कोटी रुपये खर्च करणार आहे. एमएमआरडीने २०१० ते २०१३ या काळात रेल्वे स्थानकालगत बांधलेले अनेक स्कायवॉक पालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले. त्यापैकीच नानाचौकातील हा स्कायवॉक असून त्याचा फारसा वापर होत नाही.

या स्कायवॉकवर आधीच दोन सरकते जिने आहेत. मात्र हे जिने अनेक वर्षांपासून बंद आहेत. त्यामुळे या ठिकाणी दोन सरकते जिने आणि त्यावर छत उभारण्यात येणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने स्थायी समितीकडे पाठवला आहे.

एमएमआरडीने २०१६ मध्ये हा पादचारी पूल पालिकेकडे हस्तांतरित केला, तेव्हापासून त्याची देखभाल पालिका करीत आहे. या स्कायवॉकच्या देखभालीसाठी स्वच्छता कामगार व सुरक्षा रक्षक यांचीही नेमणूक करण्यात आली होती. मात्र या पादचारी पुलावर इतर स्कायवॉकप्रमाणे पादचाऱ्यांऐवजी भिकारी, गर्दुल्ले यांचाच वावर अधिक असतो. आजही या पुलावर अत्यंत अस्वच्छता असते. त्यामुळेही पादचारी या पुलावरून जाणे टाळतात. या स्कायवॉकलगतच्या इमारतींतील लोकांना या पुलावरील भिकारी, गर्दुल्ले यांचा त्रास होत असल्याच्या तक्रारीही वाढल्या होत्या.

स्थानकाकडून येणारे पादचारी या पुलाचा वापर करतात, पण स्थानकाकडे जाणारे पादचारी जिने चढण्यास टाळतात. त्यापेक्षा सरळ चालत जाणे पसंत करतात. त्यामुळे सरकत्या जिन्यांमुळे या पुलाचा वापर वाढणार का याबाबत उत्सुकता आहे.

देखणा स्कायवॉक

ग्रॅन्ट रोड पश्चिम दिशेला असलेला हा स्कायवॉक केबल आधारित पादचारी पूल आहे. स्थानकातून पश्चिम दिशेला बाहेर पडल्यानंतर हा स्कायवॉक सुरू होतो. स्लेटर रोडवरून सरळ मार्गाने बाहेर पडल्यानंतर नाना चौक परिसरात या स्कायवॉकचा आकार अंडाकृती आहे.

या पादचारी पुलावरून बाहेर पडण्यासाठी एकूण चार मार्ग आहेत. एक जिना महापालिकेच्या ‘डी’ विभाग कार्यालयाकडे उतरतो. तिथून पादचाऱ्यांना ताडदेवच्या दिशेने जाता येते. तर एक जिना केनेडी पुलावर उतरतो. तिथून पादचाऱ्यांना गिरगावकडे जाता येते.

ऑगस्ट क्रांती मैदान मार्गावर दोन जिने उतरतात. तर नाना चौक अग्निशमन केंद्राच्या समोरच्या पदपथावर उतरण्यासाठी एक जिना आहे. तेथून पादचाऱ्यांना गावदेवी वा गिरगाव चौपाटीकडे जाता येते. ऑगस्ट क्रांती मैदान मार्गावरील व अग्निशमन केंद्राच्या समोरील प्रवेशद्वारावर सरकते जिने पूर्वीपासून आहेत. मात्र ते कित्येक वर्षांपासून बंद आहेत.

विद्यार्थी, अपंगांसाठी सुविधा

या पादचारी पुलाचा वापर थोडाफार होतो. पण सरकते जिने लावल्यास त्याचा वापर वाढेल. शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व अपंगांना सरकत्या जिन्याचा वापर होईल, असे पालिकेच्या ‘डी’ विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संतोष साळुंखे यांनी सांगितले.

नाना चौकातील स्कायवॉक म्हणजे नियोजनशून्य कारभार आहे. आधीच पुलाचा वापर होत नाही. आता सरकत्या जिन्यांसाठी पालिकेला खर्च करावा लागत आहे. पुलावर पादचाऱ्यांपेक्षा भिकाऱ्यांचीच गर्दी अधिक असते. पालिकेने या पुलाच्या देखभालीसाठी महसुलाचे स्रोत उभारावे वा काही सेवाभावी संस्थांकडे ती सोपवावी.-रवी बावकर, दक्षिण मुंबई जिल्हा कॉंग्रेस कमिटीचा अध्यक्ष

मुंबईतील एकूण स्कायवॉक

शहर- ५ पश्चिम उपनगरे – १०

पूर्व उपनगरे – ८

एकूण – २३