मुंबई : पक्ष्यांची नोंदणी करण्याचा जागतिक पातळीवरील उपक्रम अर्थात ‘ग्रेट बॅकयार्ड बर्ड काऊंटला’ आजपासून सुरुवात होत असून उपक्रम १३ ते १६ फेब्रुवारीपर्यंत जगभरात होत आहे. जगभरातील लाखो पक्षीनिरीक्षक यात सहभागी होऊन आपली निरीक्षणे ऑनलाईन नोंदवतात. याच दरम्यान भारतातही ‘कॅम्पस बर्ड काऊंट’ चे आयोजन करण्यात आले असून यात आपल्या परिसरातील, शैक्षणिक संकुलातील, कार्यलयाच्या परिसरातील पक्षांची निरीक्षणे ऑनलाईन नोंदवता येणार आहेत.

दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात ‘ग्रेट बॅकयार्ड बर्ड काऊंट’ चे आयोजन जागतिक पातळीवर केले जाते. याच दरम्यान भारतात ‘बर्ड काउंट इंडिया’ यांच्या पुढाकाराने तसेच ‘वर्ल्ड वाइल्ड लाईफ फंड इंडिया’ आणि ‘फाऊंडेशन फॉर इकोलॉजिकल सिक्युरिटी’ यांच्या सहकार्याने ‘कॅम्पस बर्ड काऊंट’ चे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या वर्षी या उपक्रमात गेल्या वर्षी या उपक्रमात १० हजाराहून अधिक नागरिकांनी आणि २४ हजाराहून अधिक ठिकाणांहून १ हजार ८६ पक्ष्यांची निरीक्षणे संकेतस्थळावर नोंदवण्यात आली होती.

भारतात दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन केले जाते. त्यात अनेकदा दुर्मीळ पक्ष्यांच्या अधिवासाविषयी महत्वाची माहिती उपलब्ध होते. या उप्रक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना पक्षीनिरीक्षणाचा आनंद घेता येतो. त्याचबरोबर या उपक्रमातून होणाऱ्या नोंदींमुळे संशोधकांना देशभरातील पक्ष्यांचे अधिवास, बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्याची पक्ष्यांची वृत्ती, तसेच पक्ष्यांच्या विविध प्रजातीत होणारी वाढ किंवा घट यांची विदा (डेटा ) उपलब्ध होतो. देशभरातून नोंदल्या जाणाऱ्या निरीक्षणांमुळे पक्ष्यांशी संबंधित अभ्यास करणे संशोधकांना सुलभ होते.

राज्यातील विविध प्रांतातील संस्थांनी, पक्षी निरीक्षकांनी आणि नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन पक्षी निरीक्षकांकडून करण्यात आले आहे. यावर्षी मुंबईतील पवई येथील आयआयटी मुंबई, कलिना येथील मुंबई विद्यापीठ परिसर, सोमय्या विद्याविहार विद्यापीठ आदी शैक्षणिक संकुलात पक्षी निरीक्षणाच्या नोंदी घेण्यात येणार आहेत.

कसे सहभागी व्हाल ?

१३ ते १६ फेब्रुवारी दरम्यान आपल्या जवळच्या परिसरात पक्षीनिरीक्षण करून पक्ष्यांची नोंदणी त्यांच्या संख्येसह करता येईल. पक्षी निरीक्षण कमीत कमी १५ मिनिटे करावे. तयार झालेल्या पक्ष्यांच्या याद्या ‘ई-बर्ड’ या संकेतस्थळावर पक्ष्यांच्या संख्येसह नोंदवता येतील. यादरम्यान स्थानिक संस्था विद्यार्थ्यांसाठी, निसर्गप्रेमींसाठी पक्षीनिरीक्षण कार्यक्रम आयोजित करू शकतात, अशी माहिती पक्षी निरीक्षक आणि अभ्यासकांनी दिली आहे. अधिक माहितीसाठी https://birdcount.in/ या संकेतस्थळाला भेट देता येईल.