मुंबई : ‘ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट २०२६’चा प्राथिमक अहवाल प्रसिद्ध झाला असून त्यात भारतभरात एकूण १ हजार ९० पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. यामुळे ‘ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट’च्या आतापर्यंतच्या नोंदींपैकी ही नोंद सर्वाधिक असल्याचे निरीक्षण ‘ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट’च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीत म्हटले आहे. जागतिक पातळीवर भारतात नोंद करण्यात आलेल्या पक्षांच्या प्रजातींच्या संख्येनुसार, भारताने चौथा क्रमांक मिळविला आहे.

‘ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट’ या उपक्रमाअंतर्गतच देशभरात ‘कॅम्पस बर्ड काउंट’चे आयोजन केले जाते. यात विविध शैक्षणिक आणि खाजगी संस्था, विविध आस्थापने तसेच पक्षी निरीक्षण करणारे संघ सहभागी होत असतात. यावर्षी देशभरातील एकूण ३४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा सहभाग होता. यात एकूण ५०३ संस्थांनी यात आपला सहभाग नोंदवून एकूण ८१८ पक्षी निरीक्षण कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

राज्यात ४१६ पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद

दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात ‘ग्रेट बॅकयार्ड बर्ड काऊंट’ चे आयोजन जागतिक पातळीवर केले जाते. याच दरम्यान भारतात ‘बर्ड काउंट इंडिया’ यांच्या पुढाकाराने तसेच ‘वर्ल्ड वाइल्ड लाईफ फंड इंडिया’ आणि ‘फाऊंडेशन फॉर इकोलॉजिकल सिक्युरिटी’ यांच्या सहकार्याने ‘कॅम्पस बर्ड काऊंट’चे १३ ते १६ फेब्रुवारीदरम्यान आयोजन करण्यात आले होते. यावर्षी महाराष्ट्रात ४१६ एकूण पक्षी प्रजातींची नोंद करण्यात आली. राज्यातील ३६ जिल्ह्यांतील पक्षीप्रेमींनी यात सहभाग नोंदवत एकूण ६ हजार ४०९ याद्यांची नोंद संकेतस्थळावर केली आहे. यात ९९३ पक्षीप्रेमी सहभागी झाले होते.

‘ग्रेट बॅकयार्ड बर्ड काऊंट’ अंतर्गत नोंदविण्यात आलेल्या पक्ष्यांच्या प्रजाती संख्येनुसार देशभरातील पक्षीप्रेमी आपल्या भागातील पक्षांची निरीक्षणे संकेतस्थळाच्या माध्यमातून नोंदवत असतात. यामुळे पक्ष्यांचे अधिवास, त्यात होणारे बदल तसेच पक्ष्यांच्या प्रजाती आणि धोक्यात असलेल्या प्रजाती यांची विदा (डेटा) उपलब्ध होत असते. यावर्षी प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे, देशभरातील एकूण १३६ प्रजातींना संवर्धनाची सर्वाधिक गरज असल्याचे ‘बर्ड काउंट इंडिया’च्या अधिकृत संकेतस्थळावर म्हटले आहे.

‘या’ पक्ष्यांच्या प्रजातींना संवर्धनाची सर्वाधिक गरज

संवर्धनाची सर्वाधिक गरज असलेल्या प्रजातींमध्ये टफ्टेड डक, ग्रेट क्रेस्टेड ग्रीब, स्वॅम्प फ्रँकोलिन, ब्लायथ्स ट्रॅगोपन, निकोबार मेगापोड, बंगाल फ्लोरिकन , इंडियन व्हल्चर, ब्राउन डिपर, पॅलस फिश-ईगल, रिथ्ड हॉर्नबिल, जेरडन’स बॅबलर, भूतान लाफिंगथ्रश, माउंट व्हिक्टोरिया बाबॅक्स, होअरी-थ्रोटेड बारविंग आणि जेरडन’स बुशचॅट यासह इतर प्रजातींचा समावेश आहे.