मुंबई उच्च न्यायालयाच्या दट्टय़ामुळे राज्य सरकारने खारफुटीला संरक्षण देताना अनेक उपाययोजना केल्याने आता मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कोकण भागात खारफुटीचे प्रमाण वाढले असून या खारफुटीमुळे जैवविविधताही वाढू लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच खारफुटीच्या हिरव्यागार जंगलात नागरीकरणामुळे नामशेष झालेले कोल्हे, मुंगूस, विविध प्रकारचे साप, अन्य सरपटणारे प्राणी, कीटक, पक्षी आणि माशांची पैदास यांचे प्रमाण पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात आढळून येऊ लागले आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने ही बाब आनंदाची असली तरी नागरी वस्तीत येणाऱ्या या प्राण्यांमुळे मानवी प्राण्यांची चिंता मात्र वाढली आहे. मुंबई, ठाणे, रायगड जिल्हय़ातील मूळ रहिवासी असणारे आगरी-कोळी बांधव यापूर्वी सरपणासाठी मोठय़ा प्रमाणात खारफुटीची तोड करीत होते. मुंबई उच्च न्यायालय, केंद्र तसेच राज्य सरकारने केलेल्या विविध कायद्यांमुळे खारफुटीला आता चांगल्या प्रकारे संरक्षण मिळाले आहे. सरकारने हे संरक्षित वन क्षेत्र जाहीर केल्याने अनेक ठिकाणी खारफुटी आणि नागरी वसाहतीच्या मध्ये हिरवे-पांढऱ्या रंगाचे खांब बसविण्यात आले आहेत. समुद्र आणि मानवी वसाहत यांच्यामध्ये हिरवी भिंत बनून राहणाऱ्या या खारफुटीच्या वाढीसाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज नाही.
नैसर्गिकरीत्या झाडावरून पडणाऱ्या अंकुरातून या रोपटय़ाची निर्मिती भरतीने वाहून जाणाऱ्या दलदलीच्या ठिकाणी होते. त्यामुळे सरपणासाठी होणारी तोड बंद झाल्याने या झाडांचे आता  बहरणारे वृक्ष तयार झाले आहेत. खाडीकिनारी ही वनस्पती आता १२ मीटरपेक्षा उंच वाढली असल्याचे दिसून येत आहे. जाळीदार फांद्या, अंडाकृती चिवट पाने, फुलांच्या झुबक्यांनी आच्छादलेली, लाल तपकरी रंगाची फळे अशा खारफुटीच्या घनदाट जंगलामुळे  मुंबईच्या आसपास येणाऱ्या सात हजार हेक्टर खारफुटी क्षेत्रात सध्या विविध प्रकारचे खेकडे, साप, कोल्हे, लांडगे, मुंगूस, सरपटणारे अन्य प्राणी, विविध प्रकारचे मंजूळ आवाज करणारे पक्षी, फुलपाखरे आढळून येऊ लागले आहेत. हे प्रमाण पूर्वीपेक्षा वाढल्याची माहिती पर्यावरण क्षेत्रात गेली वीस वर्षे काम करणाऱ्या प्रशांत महाजन यांनी दिली.
काही महिन्यांपूर्वी कोपरखैरणे येथील नागरी वसाहतीत जवळच्या खारफुटीमधून आलेल्या कोल्हय़ाचे दर्शन नागरिकांना झाले होते. पावसाळ्याच्या दिवसात सध्या खेकडे मिळण्याचे प्रमाण वाढल्याचे कोळीबांधव सांगत आहेत.
खारफुटीची जागा ही माशांच्या प्रजाननासाठी संरक्षित जागा असल्याने त्या ठिकाणी आता माशांची पैदास वाढू लागली
आहे. सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना पक्ष्यांचे विविध आवाज साद घालीत आहेत.

राज्य सरकारने खारफुटीला यापूर्वी संरक्षित वनाचा दर्जा दिला होता पण आता ते राखीव वन करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच त्यावर मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे खारफुटीचे एक मोठे बेट राज्यातील १८६ किलोमीटर क्षेत्रात उभे राहणार आहे.