निविदा प्रक्रिया न राबविता २२७ पैकी १३५ प्रस्तावांतील वस्तूंचे पैसे थेट लाभार्थीच्या खात्यावर
प्रसाद रावकर
मुंबई : मुंबई महापालिकेचा २०२१-२२ या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प मंजूर करताना प्रशासनाकडून विशेष निधीपोटी पदरात पडलेल्या ४१ कोटी ४६ लाख रुपयांपैकी तब्बल ३१ कोटी रुपयांहून रकमेची रसद तत्कालिन महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांनी सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांना पुरविल्याचे उघडकीस आले आहे. विरोधी पक्षनेत्यांसह काँग्रेसच्या नऊ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन, समाजवादी पक्षाच्या एक नगरसेवक यांना मिळून सव्वापाच कोटी रुपये देऊन बोळवण करण्यात आली आहे.
२०२१-२२ या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प मंजूर करताना महापौर आणि अध्यक्षांना मिळून ४१ कोटी ४६ लाख ४० हजार रुपये विशेष निधी मिळाला होता. मात्र मुंबई महापालिकेची २०२२ मध्ये होणारी निवडणूक डोळय़ासमोर ठेऊनच या निधीचे वाटप झाल्याचे उपलब्ध कागदपत्रांवरून स्पष्ट होत आहे.
मनसेतून शिवसेनेत विलीन झालेले सहा आणि अपक्ष तीन असे मिळून पालिकेत शिवसेनेचे संख्याबळ ९७ होते. यापैकी सुमारे ९१ नगरसेवकांच्या पदरात हा निधी पडला. मात्र मर्जीतील नगरसेवकांना बक्कळ, तर खपामर्जी असलेल्या नगरसेवकांच्या झोळीत थोडाफार निधी टाकण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. पालिकेत काँग्रेसचे २९ नगरसेवक होते. मात्र त्यापैकी विरोधी पक्षनेत्यांसह अवघ्या नऊ नगरसेवकांना, तर आठ संख्याबळ असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांपैकी केवळ दोघांनाच हा निधी वाटण्यात आला. सहा संख्याबळ असलेल्या समाजवादी पार्टीतील केवळ एका नगरसेवकाच्या नशिबी हा निधी आला. पालिकेच्या बी, सी आणि टी या प्रशासकीय विभागांच्या हद्दीतील एकाही नगरसेवकाला हा निधी मिळू शकलेला नाही. यापैकी दोन प्रभागांमध्ये भाजपचे प्राबल्य होते, तर एका प्रभागात काँग्रेसचे नगरसेवक होते. त्यामुळे या तीन विभाग कार्यालयांच्या हद्दीत विशेष निधीतून कामेच होऊ शकलेली नाहीत.
(उत्तरार्ध)
भायखळय़ात अडीच कोटींच्या वस्तूंचे वाटप
ई विभाग कार्यालयाच्या हद्दीत येणाऱ्या भायखळा आणि आसपासच्या परिसरातील पाच प्रभागांमध्ये तब्बल दोन कोटी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. या निधीतून नागरिकांना शिलाई यंत्र, घरघंट, लॅपटॉप, टॅब, अपंगांना स्कुटरचे वाटप करण्यात आले. तत्कालिन स्थायी समिती अध्यक्षांचा प्रभाग (२०९) या परिसरात होता. तेथे एक कोटी ५० लाख रुपये निधीतून शिलाई यंत्र, घरघंटी, लॅपटॉपचे वाटप करण्यात आले. भायखळा विधानसभा मतदार संघात यापैकी काही प्रभागांचा समावेश असून या मतदारसंघातून विजयी झालेल्या आमदार यामिनी जाधव स्थायी समिती अध्यक्षांची पत्नी आहेत.
२२७ पैकी केवळ ९२ कामांसाठी निविदा
या निधीतून विविध वस्तूंचे वाटप करण्यासाठी नगरसेवकांनी आपापले प्रस्ताव विभाग संबंधित कार्यालयांना सादर केले होते. सुमारे २२७ प्रस्ताव प्रशासनाला सादर झाले होते. ई-निविदा प्रक्रिया राबवून या वस्तू खरेदी करणे अपेक्षित होते. मात्र केवळ ९२ प्रस्तावांसाठी ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. उर्वरित १३५ प्रस्तावांतील वस्तूंचे पैसे थेट लाभार्थीच्या बँक खात्यावर जमा करण्याची आग्रही मागणी नगरसेवकांकडूनच करण्यात आली होती. त्यामुळे संबंधितांकडून अर्ज मागविण्यात आले. वस्तू खरेदी केल्याची पावती आणि अन्य कागदपत्रे सादर करण्याची सूचना संबंधितांना करण्यात आली होती. त्याची पडताळणी केल्यानंतर लाभार्थीच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्यात आले. मात्र या प्रकाराबाबत संशय निर्माण झाला आहे.
निधी वाया
सत्ताधाऱ्यांनी स्वपक्षाच्या, तसेच मर्जीतील नगरसेवकांच्या पारडय़ात भरभरुन विशेष निधी टाकला. मात्र चार कोटी ५६ लाख ५० हजार ८४० रुपये विकास कामांवर खर्च करण्यात ही मंडळी अपयशी ठरली आहेत. त्यामुळे निधी वाया गेला आहे.
पक्षनिहाय निधी वाटप
• शिवसेना – ३१ कोटी ५९ लाख ९९ हजार १६० रुपये
• काँग्रेस – ३ कोटी ९५ लाख रुपये
• राष्ट्रवादी काँग्रेस – ७५ लाख रुपये
• समाजवादी पार्टी – ५० लाख रुपये
• दोन अपक्ष – ४० लाख रुपये
• भाजप – —