मुंबई: लग्नासाठी तयार केलेले दागिने हिऱ्यांनी सजविण्याच्या बहाण्याने होणाऱ्या नवरदेवाने अडीच लाख रुपयांचे दागिने पळवल्याची घटना गोवंडी परिसरात घडली. याबाबत तरुणीने केलेल्या तक्रारीवरून शिवाजी नगर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

तक्रारदार २३ वर्षीय तरुणी एका नामांकित कंपनीत उच्च पदावर कामाला असून ती गोवंडीच्या शिवाजी नगर परिसरात कुटुंबियांसोबत राहते. काही महिन्यांपूर्वी तिने लग्न जुळवणाऱ्या एका संकेतस्थळावर लग्नासाठी आपली माहिती समाविष्ट केली होती. काही दिवसांपूर्वी नबील खान (३२) या इसमाने तिला संदेश पाठवला आणि तिचा मोबाइल क्रमांक घेतला. काही दिवस एकमेकांशी फोनवर बातचीत केल्यानंतर दोघांनी ही बाब घरच्या सदस्यांना सांगितली. त्यानुसार दोघांच्या कुटुंबियांनी त्यांच्या लग्नाला मान्यताही दिली.

याचदरम्यान आरोपीने तरुणीला कुटुंबियांनी लग्नासाठी दागिने तयार केले आहेत का अशी विचारणा केली. तरुणीने होकार दिल्यानंतर त्याने या दागिन्यांचे छायाचित्र तरुणीकडे मागितले. दागिन्यांचे छायाचित्र पाहिल्यानंतर त्याने आपला दागिने हिऱ्यांनी सजविण्याचा व्यवसाय असल्याचे सांगितले. लग्नापूर्वी दागिन्यांना हिरे लावून देतो असे त्याने तरुणीला सांगितले. त्यानंतर त्याने तरुणीला अडीच लाख रुपये किमतीचे दागिने घेऊन भेटण्यासाठी बोलावले. त्या दिवशी दोघेही मुंबई शहरात दिवसभर फिरले. सायंकाळी आरोपीने तरुणीकडून दागिने घेतले आणि दोन दिवसांत हिरे लावून दागिने आणून देतो, असे सांगितले.

तरुणीने या भामट्यावर विश्वास ठेवला आणि त्याच्याकडे दागिने सोपवले. दुसऱ्या दिवशी तरुणीने त्याच्याशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीचा फोन बंद होता. एक दिवस उलटल्यानंतर तरुणीने पुन्हा त्याच्याशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तेव्हाही त्याचा फोन बंदच होता. अखेर तरुणीने या प्रकरणी बुधवारी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.