गोराईतील खूनप्रकरणी तरुणाला लखनऊमधून अटक

कुटुंबाच्या दबावामुळे लग्न करावे लागल्याच्या रागाने विवाहाच्या तिसऱ्याच दिवशी पत्नीची गळा आवळून हत्या करणाऱ्या तरुणास एमएचबी पोलिसांनी लखनऊ येथून अटक केली. या तरुणीशी लग्न करण्याची इच्छा नव्हती. परंतु, कुटुंबियांच्या दबावामुळे लग्न करावे लागले. त्यामुळे हे अतिरेकी पाऊल उचलल्याची कबुली या तरुणाने दिली आहे.

१० एप्रिलला गोराई बेस्ट डेपोच्या मागील बाजूस एका विवाहित तरूणीचा मृतदेह पोलिसांना मिळाला होता. गळयाभोवती आवळल्याच्या खुणा, साडीवर रक्ताचे डाग आढळल्याने पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. मात्र तरूणीची ओळख पटत नसल्याने तपास पुढे सरकत नव्हता. अखेर पोलिसांनी या तरूणीचा फोटो व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवरून प्रसारीत करण्यात आला. तसेच मुंबई व आसपासच्या उपनगरांमधील पोलीस ठाण्यांनाही धाडला. त्यानंतर पुढे आलेल्या एका तरुणाने ही विवाहित तरुणी आपली बहिण सबरीन(२२) असल्याची माहिती पोलिसांना दिली. तसेच ६ एप्रिलला तिचा विवाह गोराईत राहाणारा, पेशाने इलेक्ट्रीशीयन असलेल्या व मुळचा उत्तरप्रदेश, बाराबंकीचा रहिवासी असलेल्या आसीफ सिद्धिकी(२५) याच्याशी झाल्याचेही त्याने सांगितले. लग्नानंतर नवदाम्पत्य लगेच मुंबईला आले होते. परंतु, त्यानंतर दोघांशी संपर्क होत नव्हता, अशी माहिती त्याने दिली. त्यानंतर पोलिसांनी आसिफचे छायाचित्र मिळवून परिसरात चौकशी सुरू केली. त्याआधारे आसिफ गोराईच्या भीमनगर परिसरात रहात असल्याचे समजले. परंतु, तोही काही दिवसांपासून बेपत्ता असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी मोबाइल लोकेशन तसेच अन्य तांत्रिक तपासाच्या आधारे आसिफला लखनऊ येथून अटक केली.

सबरिनसोबत लग्न करण्याची अजिबात इच्छा नव्हती. मात्र घरच्यांनी जबरदस्तीने लग्न लावून दिले. त्यामुळे तीची हत्या करावी लागली, असे त्याने चौकशीत सांगितले आहे. उत्तरप्रदेशातून ९ एप्रिलला सब्रीनसोबत आसीफ मुंबईत आला. त्याच दिवशी त्याने गोराई किनाऱ्यावर तीची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर दोन दिवस तो आपल्या घरीच होता. मात्र पोलिसांकडून सबरिनचे छायाचित्र समाजमाध्यमांवरून पसरविण्यात आल्याची माहिती मिळताच तो तेथून पसार झाला.