आझाद मैदानात जमलेल्या संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचा निर्धार

मुंबई : निकराची लढाई लढण्यासाठी कुटुंबासह जमलेले एसटी कर्मचारी मंडपाला परवानगी नसल्यामुळे उन्हात होरपळत आझाद मैदानात ठाण मांडून बसले आहेत. १५-२० वर्षे नोकरी करूनही १५-२० हजार रुपये पगार मिळत असेल तर उदरनिर्वाह कसा चालवायचा, असा प्रश्न करत ‘विलिनीकरणाची लेखी हमी द्या आणि तातडीने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन द्या’ असा या संपकऱ्यांचा आग्रह आहे. मागण्या पूर्ण होत नाहीत तोवर मैदान सोडणार नाही, असेही ते निग्रहाने सांगतात.

 विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या २९ ऑक्टोबरपासून राज्यातील काही परिवहन आगारात संप सुरू झाला. या संपाची तीव्रता वाढत गेली आणि संपाचे लोण राज्यातील सर्व आगारात पसरले. बघता बघता आगारातील कामकाज ठप्पच झाले. राज्य सरकार, एसटी महामंडळापर्यंत आपल्या मागण्या पोहोचविण्यासाठी १३ दिवसांपूर्वी विविध भागांतून एसटीचे कर्मचारी आझाद मैदानात दाखल झाले. मागण्या मान्य होत नसल्याने आझाद मैदानात दाखल होण्याचे आवाहन संघटनेतर्फे समाजमाध्यमांद्वारे कर्मचाऱ्यांना करण्यात आले. तात्काळ त्याला प्रतिसाद देत  कर्मचारी पत्नी, लहान मुलांसह मोठय़ा संख्येने आझाद मैदानावर दाखल झाले.

जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत मैदान सोडणार नाही असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. गुहागर आगारात चालक म्हणून असलेले अविनाश नलावडे गेल्या १३ दिवसांपासून आझाद मैदानात हजर आहेत. विलीनकरण ही प्रमुख मागणी आहेच, परंतु ती प्रक्रिया करण्यासाठी वेळ लागणार असेल, तर तोपर्यंत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन द्या, आम्ही संप मागे घेऊ, असे ते म्हणतात. दहा ते पंधरा वर्षांत वेतनात फारशी वाढ झालेली नाही. तसेच कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थितीही सुधारत नाही, याला जबाबदार एसटी महामंडळ, एसटी कामगार संघटना आणि तेवढेच राज्य सरकारही आहे, असेही ते म्हणाले.

‘गेली १२ वर्षे एसटीची सेवा केली. पण फक्त १५ ते १६ हजार रुपये वेतन मिळते,’ अशा शब्दांत लातूर आगारातील वाहक शिवप्पा मतपती यांनी नाराजी व्यक्त केली. विलीनीकरण किंवा शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन या मागणीसाठी संप केला. परंतु परिवहनमंत्री अनिल परब किंवा एसटीचा एकही अधिकारी आझाद मैदानात कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आलेला नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. 

ऊन सोबतीला, पोलीस राखणीला

आझाद मैदानात मोठय़ा संख्येने आलेले एसटी कर्मचारी दिवसरात्र ठाण मांडून बसले असून त्यांच्या सोयीसाठी प्रसाधनगृह, विविध संघटनांमार्फत जेवण्याची व्यवस्था, झोपण्यासाठी सतरंजी आदी व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिसांकडून मंडपाची परवानगी न मिळाल्याने भर उन्हात आंदोलनासाठी बसावे लागत आहे. आंदोलनात आलेल्यांमध्ये महिला आणि काहींसोबत लहान मुलेही आहेत. मैदानात आंदोलनस्थळीच बाजूला उभ्या असलेल्या पोलिसांच्या तसेच खासगी वाहनांच्या सावलीचा आधार कर्मचाऱ्यांना घ्यावा लागत आहे. आझाद मैदानात संपासाठी आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन तेथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.