जांभोरी मैदानाबाहेरील महात्मा गांधींच्या नावाचा फलक हटवला

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : मालाडच्या मालवणी परिसरातील मैदानाला टिपू सुलतान यांचे नाव दिल्यावरून राजकारण तापलेले असताना आता वरळीच्या बीडीडी चाळीतील प्रसिद्ध जांभोरी मैदानाच्या प्रवेशद्वारावरील महात्मा गांधींच्या नावाचा फलक हटवल्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. मैदानाला अनधिकृतरीत्या टिपू सुलतान यांचे नाव देणाऱ्या शिवसेनेला महात्मा गांधींच्या अधिकृत नावाचा विसर पडला असल्याची टीका भाजपने केली आहे.

मालाडमधील मैदानाला टिपू सुलतान यांचे नाव दिल्याच्या मुद्दय़ावरून उडालेला राजकीय धुरळा बसतो न बसतो तोच भाजपने आता वरळीच्या मैदानावरून शिवसेनेला लक्ष्य केले आहे. वरळीच्या बीडीडी चाळीतील प्रसिद्ध जांभोरी मैदानावरील महात्मा गांधींच्या नावाचा फलक हटवण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे. मैदानाला अनधिकृतपणे टिपू सुलतान यांचे नाव देणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेला वरळी बी.डी.डी. चाळीतील जांभोरी मैदानावर महात्मा गांधीजींच्या नावाचा फलक लावण्याचे भान नाही, असा आरोप भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मैदानाचे लोकार्पण झाल्यावरही सत्तेसाठी धर्माध शक्तींशी हातमिळवणी करणाऱ्यांना महात्माजींचा विसर पडावा हे दुर्दैवी आहे, अशी टीका शिंदे यांनी शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत केली. टिपू सुलतानच्या अनधिकृत नामफलकाला संरक्षण देणारे, आजही मैदानाच्या प्रवेशद्वारावर अनधिकृत नामफलक दिमाखात मिरवत ठेवणारे महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचे नेते आता वरळीतील मैदानावर अधिकृत नामकरणाचा फलक त्वरित लावतील का? असे प्रश्न शिंदे यांनी उपस्थित केले.  मैदानाच्या प्रवेशद्वारावर नामफलक लावलेला नसेल तर तो ताबडतोब लावा, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी या वेळी प्रशासनाला दिले. आम्ही विभागातील फलक नवीन पद्धतीने तयार करून घेत आहोत. आधीचे फलक खराब झाल्यामुळे त्या जागी लवकरच नवीन नामफलक बसविण्यात येईल, असे साहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी स्पष्ट केले.

भाजपचे गांधीप्रेम

मैदानात दहा दिवसांमध्ये महात्मा गांधीजींच्या नावाचा फलक न लावल्यास भाजपतर्फे गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपने दिला आहे. यानिमित्ताने भाजपला महात्मा गांधींच्या कार्याची आठवण झाली आहे. स्वातंत्र्यलढय़ामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा जांभोरी मैदानास पदस्पर्श झाला होता. स्वातंत्र्यानंतर या मैदानाचे नामकरण ‘महात्मा गांधी मैदान’ असे करण्यात आले. या मैदानाला ऐतिहासिक दर्जा प्राप्त झाला आहे. नुकतेच या मैदानाचे सुशोभीकरण करण्यात आले. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या मैदानाचे लोकार्पणही करण्यात आले; परंतु नूतनीकरण केल्यानंतर मैदानातील कुठल्याही प्रवेशद्वारावर अथवा पर्यावरणमंत्री यांच्या ट्विटमध्ये ‘महात्मा गांधी मैदान’ असा उल्लेख नाही, असा मुद्दा भाजपने उपस्थित केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ground worli midst controversy ysh
First published on: 29-01-2022 at 00:02 IST