मुंबई : भारतातील नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) मंजूर केलेल्या उड्डाण प्रशिक्षण संस्थांनी (फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन) गेल्या पाच वर्षांत (२०२१ ते २०२५) ९ हजार ६०९ विद्यार्थी वैमानिक परवाने जारी केले आहेत. २०२४ मध्ये सर्वाधिक २ हजार ३६४ परवाने देण्यात आले. तर २०२५ मध्ये २ हजार ३०९ विद्यार्थ्यांनी वैमानिक होण्याचा परवाना घेतला आहे.
करिअरच्या संधी आणि वाढत्या मागणीमुळे देशात विद्यार्थी वैमानिकांची संख्या वाढत आहे. येत्या १५ वर्षांत सध्या कार्यरत असलेल्यांपैकी ३० टक्क्यांहून अधिक पायलट निवृत्त होणार असून, नव्या पायलटची मोठी गरज भासणार आहे. २० ते ३९ वयोगटातील तरुण वैमानिक प्रशिक्षणाकडे आकर्षित होत आहेत. विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे विमान कंपन्यांकडून वैमानिकांच्या मागणीत वाढ होत आहे.
सध्या देशातील ६३ उड्डाण तळांवर नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने मान्यता दिलेल्या ४१ उड्डाण प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत. प्रारंभिक उड्डाण प्रशिक्षण सुरू होण्यापूर्वी उड्डाण प्रशिक्षण संस्थामध्ये नावनोंदणी केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला विशेष उड्डाण परवाना दिला जातो. विद्यार्थी वैमानिक परवाना हा भारतात वैमानिक बनण्याच्या प्रवासातील पहिला आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे.
वर्ष – परवान्यांची संख्या
२०२१ – १,१७३
२०२२ – १,६७५
२०२३ – २,०८८
२०२४ – २,३६४
२०२५ – २,३०९
व्यावसायिक वैमानिक परवान्यांत वाढ
विद्यार्थी वैमानिक परवाना मिळाल्यानंतर, विद्यार्थी खाजगी पायलट परवाना किंवा व्यावसायिक पायलट परवाना मिळवण्यासाठी आवश्यक उड्डाण तास पूर्ण करतात. देशात गेल्या ५ वर्षांत नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने मोठ्या संख्येने व्यावसायिक वैमानिक परवाने जारी केल्याने वैमानिकांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. २०२४ मध्ये नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने विक्रमी १ हजार ६२८ व्यावसायिक वैमानिक परवाने जारी केले. २०२३ मध्ये एकूण परवान्यांपैकी १८ टक्के म्हणजेच २९२ महिलांनी व्यावसायिक वैमानिक परवाना मिळवला होता. गेल्या ८ वर्षांत व्यावसायिक वैमानिक परवान्यांची संख्या अडीच पटीने वाढली आहे. व्यावसायिक वैमानिक प्रवासी आणि मालवाहू विमाने चालवतात. तसेच शोध आणि बचाव कार्यातही मदत करतात.
५ वर्षांतील व्यावसायिक वैमानिक परवाने
वर्ष – व्यावसायिक वैमानिक परवाने
२०२० – ५७८
२०२१ – ८६२
२०२२ – १,१६५
२०२३ – १,६२२
२०२४ – १,६२८
