मुंबई : रुग्णसेवेचे कारण देत जी.टी. रुग्णालय प्रशासनाने सामाजिक उत्तरदायीत्त्वातून (सीएसआर) तब्बल १० लाख रुपयांना खरेदी केलेल्या दोन गोल्फ कार तीन महिन्यांपासून धूळखात पडल्या आहेत.
जी.टी. रुग्णालयाचे नुकतेच वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रुपांतर करण्यात आल्याने तेथे अनेक वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी सीएसआर निधी वापरणे आवश्यक असताना रुग्णालय प्रशासनाकडून गोल्फ कारसारख्या अनावश्यक वस्तू खरेदी करण्यास प्राधान्य दिले आहे. तसेच या गोल्फ कार खरेदी केल्यापासून त्यांचा कोणत्याही कामासाठी वापर झालेला नसून, त्या रुग्णवाहिका उभ्या करण्याच्या जागेत धूळखात पडल्या आहेत.
जी. टी. रुग्णालयाने जानेवारी २०२६ मध्ये दोन गोल्फ कार सीएसआर निधीतून खरेदी केल्या. या दोन्ही कार खरेदीसाठी आयडीबीआय बँकेने १० लाख सीएसआर निधी उपलब्ध करून दिला होता. या सीएसआर निधीतून खरेदी करण्यात आलेल्या दोन गोल्फ कारपैकी एक गोल्फ कार जी. टी. रुग्णालय, तर दुसरी कार कामा रुग्णालयामध्ये ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे गोल्फ कार मोठ्या संकुलामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी वापरली जाते.
मात्र जी. टी. रुग्णालय व कामा रुग्णालयाचे संकुल हे फारच लहान आहे. तसेच या दोन्ही रुग्णालयातील इमारती या जवळजवळ असून, सर्व इमारतींच्या प्रवेशद्वारावर टॅक्सी सहज जाते. त्यामुळे या गोल्फ कारचा या दोन्ही रुग्णालयांसाठी कोणताही उपयोग नाही. असे असतानाही जी. टी. रुग्णालय प्रशासनाने दोन गोल्फ कार खरेदी करून तब्बल १० लाख रुपये सीएसआर निधी वाया घालवला. या दोन्ही कार रुग्णालयांमध्ये विनावापर धूळखात पडल्या आहेत.
दोन वर्षांपूर्वी जी. टी. रुग्णालय व कामा रुग्णालयाचे एकत्रितरित्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रुपांतर करण्यात आले. यामुळे दक्षिण मुंबईतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. या दोन्ही रुग्णालयामध्ये अद्ययावत व अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करण्यावर रुग्णालय प्रशासनाकडून भर देणे आवश्यक होते. जिल्हा नियोजन समितीमार्फत कामा रुग्णालयातील ऑन्को सर्जरीसाठी मॉड्युलर शस्त्रक्रियागृह उभारण्यासाठी पाच कोटी रुपये निधी उपलब्ध करण्यात आला होता.
मात्र अधिष्ठात्यांनी या निधीचा वापर न करता तो परत पाठवून दिला. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णांसाठी आवश्यक वस्तूंऐवजी अनावश्यक वस्तू खरेदीला प्राधान्य देण्यात येत आहे. यासंदर्भात जी. टी. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जीतेंद्र देशमुख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही.
गोल्फ कार खरेदीसाठी प्रशासकीय मान्यता नाही
सरकारी निर्णयानुसार १ लाख रुपयांपर्यंतची खरेदी विभागप्रमुखांना करता येते. मात्र त्यावरील रकमेची वस्तू खरेदी करण्यासाठी प्रशासकीय मान्यता घेणे आवश्यक असते. आयडीबीआय बँकेच्या सीएसआर निधीतून खरेदी करण्यात आलेल्या गोल्फ कारची किंमत १० लाख रुपये आहे. त्यामुळे त्यासाठी प्रशासकीय मान्यता घेणे आवश्यक होते. मात्र जी. टी. रुग्णालय प्रशासनाने यासाठी प्रशासकीय मान्यता घेतलेली नाही.
