चार-पाच महिन्यांत पुनर्विकासाला सुरुवात, रहिवाशांना मिळणार ६३५ चौ. फुटांची घरे
मुंबई : शीव कोळीवाडा, जीटीबी नगर येथील सिंधी निर्वासितांच्या २५ इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाने कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी (सी अँड डी) म्हणून नियुक्त केलेल्या किस्टोन रिअलटर्स (रुस्तमजी समूह) आणि मुंबई मंडळ यांच्यात गुरुवारी बांधकाम विकास करार झाला. तसेच यावेळी त्रिपक्षीय विकास करारही करण्यात आला.
आता प्रकल्प आराखडा तयार करण्यासह इतर प्रक्रिया पूर्ण करून येत्या चार-पाच महिन्यांत प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करण्यात येणार आहे. २५ इमारतींच्या जागी ३९ ते ४८ मजल्यांच्या तीन पुनर्वसित इमारती उभारण्यात येणार आहेत. तर १२०० रहिवाशांना या इमारतीत ६३५ चौरस फुटांची घरे दिली जाणार असून अनेक सुविधाही पुरविल्या जाणार आहेत.
सिंधी निर्वासितांच्या २५ इमारतींची प्रचंड दूरवस्था झाल्याने या इमारतींचा तात्काळ पुनर्विकास करणे गरजेचे होते. इमारतींची दूरवस्था लक्षात घेता मुंबई महापालिकेने काही वर्षांपूर्वी या इमारतींचा समावेश अतिधोकादायक इमारतींमध्ये करून इमारती तातडीने रिकाम्या करून घेतल्या, रहिवाशांचे इतरत्र स्थलांतर केले. मात्र पुनर्विकास मार्गी न लागल्याने रहिवासी चिंतेत होते. पुनर्विकासासाठी रहिवाशांचा राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू होता. अखेर त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले आणि राज्य सरकारने हा पुनर्विकास म्हाडाकडे सोपविला.
जीटीबी नगरच्या पुनर्विकासाची जबाबदारी आल्यानंतर मुंबई मंडळाने मोतीलाल नगरच्या धर्तीवर खासगी विकासकाची अर्थात कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सीची नियुक्ती करून पुनर्विकास मार्गी लावण्याचा निर्णय मंडळाने घेतला. या निर्णयानुसार निविदा प्रक्रिया सुरू केली, मात्र निविदा प्रक्रिया काही महिने न्यायालयीन वादात अडकली होती, पण एप्रिल २०२५ मध्ये न्यायालयाने विकासकाची याचिका फेटाळून लावत पुनर्विकासाचा मार्ग मोकळा केला. त्यानंतर मंडळाने किस्टोन रिअलटर्सची निविदा अंतिम करून त्यास सरकारची मान्यता घेतली.
निविदा अंतिम झाल्याने आता हा पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी गुरुवारी मुंबई मंडळ आणि किस्टोन रिअलटर्स यांच्यात बांधकाम विकास करार झाला. आता किस्टोनकडून प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करून त्यास उच्चस्तरीय समितीची मान्यता घेतली जाईल. त्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करून येत्या चार ते पाच महिन्यांत प्रत्यक्ष पुनर्विकासाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. कित्येक वर्षांपासून रखडलेला पुनर्विकास अखेर आता मार्गी लागणार असल्याने १२०० रहिवाशांसाठी ही दिलासादायक बाब ठरणार आहे.
बँक्वेट हॉल, वाहनतळासह अनेक सुविधा
जीटीबी नगर येथील २५ इमारतींच्या जागी तीन पुनर्वसित इमारती बांधल्या जाणार आहेत. या इमारती ३९ ते ४८ मजली असण्याची शक्यता आहे. तर रहिवाशांना यामध्ये ६३५ चौरस फुटांची घरे दिली जाणार असून पुनर्वसित इमारतीतील घरांचा ताबा मिळेपर्यंत १२०० रहिवाशांना दरमहा २० हजार रुपये घरभाडे दिले जाणार आहे. भुयारी वाहनतळ, व्यायामशाळा, खेळाचे मैदान, वाचनालय, चार हजार चौरस फुटांचा बँक्वेट हॉल, बगीचा अशा अनेक सुविधाही येथे विकसित केल्या जाणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे या पुनर्विकासातून मुंबई मंडळाला घरनिर्मितीसाठी अंदाजे २४ हजार चौरस मीटर क्षेत्र उपलब्ध होणार आहे. या क्षेत्रावर ४५० चौरस फुटांची अंदाजे ५०० घरे बांधता येणार असून ही घरे सोडतीद्वारे सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार आहेत.
