scorecardresearch

मुंबईतील विकासकामांना पालकमंत्र्यांचा निधी ; जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सहा चौकांचे सुशोभीकरण

जिल्हा नियोजन समितीने ३५ कोटी ९० लाख रुपये निधी देण्याचे हमीपत्र पालिकेच्या नियोजन विभागाला दिले आहे

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : निवडणूक जवळ आल्यामुळे मुंबईतील विकासकामांना वेग आला असून पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनीही आपला जिल्हा नियोजन समितीचा काही निधी पालिकेला दिला आहे. जिल्हा नियोजन समितीने ३५ कोटी ९० लाख रुपये निधी देण्याचे हमीपत्र पालिकेच्या नियोजन विभागाला दिले आहे. या निधीतून आधुनिक बसथांबे, उद्यानांचा विकास व हिरवळीच्या जागा वाढवणे तसेच चौकांचे सुशोभीकरण अशी कामे हाती घेतली जाणार आहे. याच अंतर्गत उपनगरातील सहा महत्त्वाच्या चौकांचे सुशोभीकरण करण्यात येणार असून त्याकरिता १९ कोटी ५१ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

पालिकेची निवडणूक जवळ आल्यामुळे मतदारांना आकर्षित करण्यासाठी सत्ताधारी शिवसेना आधीच मोठमोठय़ा विकासकामांच्या प्रकल्पांचे प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजूर करीत आहे. उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे असून त्यांनी आपला निधी मुंबईच्या विकासकामांसाठी मुंबई महापालिकेला दिला आहे. त्याअंतर्गत शहर भागात विविध कामे हाती घेतली जाणार असून ही विकासकामे मुंबई महापालिकेमार्फत करण्यात येणार आहे. त्यात उपनगरातील सहा चौकांचे सुशोभीकरण करण्यात येणार असून आवश्यक तेथे रुंदीकरणासह सौंदर्यीकरणही करण्यात येणार आहे. वाहनांबरोबरच पादचाऱ्यांचाही विचार करून आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी १९ कोटी ५१ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. तसा प्रस्ताव शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे.

महापालिकेने या प्रकल्पासाठी २५ कोटी ७१  लाख रुपयांचे अंदाजपत्र तयार केले होते. पात्र कंत्राटदाराने २४.१० टक्के कमी दराने १० लाख ५१ हजार रुपयात हे काम करण्याची तयारी दाखवली आहे. चौकांच्या सुशोभीकरणासाठी पश्चिम उपनगरातील चार व पूर्व उपनगरातील दोन चौकांची निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पात फक्त चौकांची रंगरंगोटी, फलक लावण्यासह चौकांमध्ये हिरवळ तयार केली जाणार आहे. आवश्यक असलेल्या ठिकाणी रुंदीकरण करण्यात येणार आहे. या सहा चौकांच्या परिसरात वाहनांसह पादचाऱ्यांनाही अडथळा होणार नाही अशा पद्धतीने नियोजन करण्यात येणार आहे.

सहा चौक कोणते?

अंधेरी घाटकोपर जोड रस्त्यावरीर साकिनाका जंक्शनपासून पश्चिम द्रुतगर्ती मार्ग मेट्रो स्थानकापर्यंत, जुहू विलपार्ले जंक्शन, जोगेश्वरी विक्रोळी आणि साकी विहार रोड जंक्शन, कांदिवली साई स्टार जंक्शन, महात्मा गांधी रोड आणि साकी विहार जंक्शन मथुरासाद मार्गापर्यंत, साकी विहार रोड जंक्शन कांदिवली, मुलूंड आर्य समाज चौक

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Guardian minister s funds for development works in mumbai zws