नववर्ष मिरवणुकांच्या निमित्ताने शिवसेना-भाजप आमनेसामने

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपासून एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडण्यास तयार नसलेल्या शिवसेना-भाजपने गुढीपाडव्याच्या निमित्ताने निघणाऱ्या स्वागतयात्रांतूनही चढाओढ चालवली आहे. आतापर्यंत दादर, गिरगाव या परिसरांपुरत्याच मर्यादित राहिलेल्या नववर्ष स्वागतयात्रांचे पेव आता उपनगरांतही फुटले आहे. त्यातच सांस्कृतिक वर्चस्ववादातून शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या विभागांत शोभायात्रांचे आयोजन केल्याने आज, मंगळवारी साजरा होत असलेला पाडवा मुंबईत मोठय़ा दणक्यात साजरा होण्याची चिन्हे आहेत. हिंदू नववर्ष स्वागतानिमित्त चित्ररथ, देखावे, लेझीम, महिलांची बाइक रॅली, ढोल-ताशांचा कडकडाट आदीतून मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या शोभायात्रांनी मंगळवारी अवघी मुंबई ‘गुढीपाडवा’मय होणार आहे.

गिरगावात आतापर्यंत शोभायात्रेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांची मोठी संख्या असलेल्या स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानचा वरचष्मा होता; परंतु दोन वर्षांपूर्वी या वर्चस्वाला शह देण्यासाठी शिवसेनेनेही या भागात शोभायात्रा आयोजिण्यात पुढाकार घेतला. त्यामुळे गेली दोन वर्षे शोभायात्रेच्या वेळी गिरगाव परिसराला पोलिसांच्या छावणीचे रूप आले होते. एकाच मार्गावरून काढण्यात येणाऱ्या या दोन वेगवेगळ्या शोभायात्रांमुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. मात्र केवळ गिरगावातच नव्हे तर यंदा विलेपार्ले, जोगेश्वरी, बोरिवली, गोरेगाव अशा विविध भागांत भाजप-शिवसेनेत ‘शोभायात्रा’ रंगणार आहेत.

गिरगावात स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानच्या वतीने काढण्यात येणाऱ्या हिंदू नववर्ष स्वागतयात्रेत थोर वीरांच्या शौर्यगाथेला अभिवादन करण्यात येणार आहे. सकाळी ८ वाजता गणेश मंदिर येथे गणेशपूजनानंतर स्वागतयात्रेला प्रारंभ होईल. या वेळी भाजपचे स्थानिक आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ५० फुटी उंच गुढी उभारण्यात येणार आहे. २० फूट उंच बाजीप्रभू देशपांडे यांची इकोफ्रेंडली प्रतिमा, गिरगाव ध्वज पथक व गजर ढोल पथक यांच्या १२०० तरुण-तरुणींचा आविष्कार, श्री क्षेत्र जेजुरीचा देखावा, स्वास्थ्यरंग परिवारातर्फेतर्फे ढोलाच्या तालावर रांगोळीची जुगलबंदी, रंगशारदाच्या वतीने यात्रेच्या मार्गावर रांगोळीच्या पायघडय़ा, गिरगाव कलामंच परिवारातर्फे गिरगाव चर्च चौकात रांगोळीची आरास, शिवगर्जना मर्दानी तालीमतर्फे प्राचीन युद्धकलेची प्रात्यक्षिके, महाराष्ट्र लोककलांचे सादरीकरण, पारंपरिक वेशातील दुचाकीस्वार महिलांचे ‘आदिशक्ती’ पथक व युवकांचे ‘युवाशक्ती’ पथक हे या यात्रेचे आकर्षण असेल.

गिरगावातच हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे आयोजिण्यात आलेल्या शोभायात्रेत शिवसेना नेते मोठय़ा संख्येने सहभागी होणार आहेत. गिरगाव नाका ते प्रिन्सेस स्ट्रीट या मार्गादरम्यान काढण्यात येणाऱ्या या शोभायात्रेचे मुख्य आकर्षण २५ फुटी हनुमानाची भव्य मूर्ती आहे. याशिवाय श्रीराम, शिवाजी महाराज, दत्त आदींच्याही २० फुटी मूर्त्यां यंदाच्या यात्रेत दिसतील. या यात्रेत परिसरातील ३५ सार्वजनिक उत्सव मंडळे सहभागी होणार असून चित्ररथ, महिला बाइकस्वार, तारपा नृत्य, ढोल पथक, सेल्फी पॉइंट अशी या यात्रेची वैशिष्टय़े असतील. याखेरीज दादर, धारावी, बोरिवली, गोरेगाव, जोगेश्वरी, मुलुंड या भागांतही विविध मंडळांतर्फे, राजकीय पक्षांतर्फे नववर्ष स्वागतयात्रा निघणार आहेत.

गिरगावात कडेकोट बंदोबस्त

’ गिरगावातून निघणाऱ्या दोन शोभायात्रा एकमेकांना भिडू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी विशेष काळजी घेत परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.

’ या ठिकाणी स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानच्या वतीने अनेक वर्षांपासून आयोजित केल्या जाणाऱ्या शोभायात्रेशी स्पर्धा करीत शिवसेनेनेही अलिकडच्या वर्षांत शोभायात्रा काढण्यास सुरुवात केली.

’ गेल्यावर्षी प्रतिष्ठानने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तर शिवसेनेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. त्यामुळे गेल्या वर्षी स्थानिक पोलिसांना या व्हीआयपींमुळे दोन दिवस आधीपासूनच परिसरात सुरक्षेच्या उपाययोजना कराव्या लागल्या होत्या. तसेच अधिकच्या बंदोबस्तासाठी निमलष्करी तुकडय़ांनाही पाचारण करावे लागले होते.

’ या वर्षी दोन्ही शोभायात्रांमध्ये व्हीआयपी आमंत्रित नाहीत. मात्र शिवसेना, भाजप या दोन्ही पक्षांमध्ये सुरू असलेल्या धुसफुशीला शोभायात्रांच्या निमित्ताने हवा मिळू नये, यासाठी  विशेष काळजी घेण्यात येत आहे.

’ पोलिसांनी घेतलेल्या शोभायात्रा आयोजकांच्या बैठकीत दोन्ही शोभायात्रांचा मार्ग, वेळ निश्चित करण्यात आली असून, आयोजकांना विनाकारण कुरघोडी न करण्याची समज देण्यात आली.