लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : गुढीपाडवा म्हणजे नव्या आशा, स्वप्ने आणि सकारात्मकतेने भरलेली नववर्षाची सुरुवात. यंदा जागतिक पातळीवर अस्थिरतेचे ढग दाटले असले तरी गुढीपाडव्यानिमित्त बाजारात चैतन्यमय आणि उत्साहाचे वातावरण कायम आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या मांगल्यदिनी बांधकाम, वाहन, सराफा, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाजारात कोट्यवधींची उलाढाल होण्याची अपेक्षा आहे.
पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक पातळीवर अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याने भाववाढ झाली आहे. मात्र या भाववाढीचा परिणाम सणोत्सवावर झालेला दिसत नाही. गुढीपाडव्यानिमित्त बाजारपेठांमध्ये मोठी लगबग पाहायला मिळत असून झेंडूची फुले, साखरेच्या गाठी, तोरण आणि गुढीच्या वस्त्रांना मोठी मागणी आहे. दादर, नवी मुंबई, कल्याणसह ठिकठिकाणच्या फूल बाजारात मोठी आवक झाली. मागणीच्या तुलनेत झेंडूची आवक वाढल्याने दरात १० टक्क्यांनी घट झाली.
गुढीपाडव्याच्या दिवशी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केले जात असल्याने सराफा बाजारात मोठी उलाढाल असते. यंदा सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. गतवर्षी गुढीपाडव्याला सोने प्रति तोळा ९० हजाराच्या आसपास होते. वर्षभरात मात्र ते दीड लाखाच्या वर गेले आहे. बुधवारी सोन्याच्या भावात प्रति तोळा ३,४९१ रुपयांची घसरण झाली आणि १,५२,४९४ रुपयांवर व्यवहार सुरू होते. चांदीच्या किमतीतही ७,४१३ रुपयांची घसरण होऊन भाव प्रति किलो २,४५,६९९ रुपये होता. सोने-चांदीच्या किमतीतील ताजी घसरण ही ग्राहकांच्या मागणीला चालना देणारी ठरण्याची अपेक्षा आहे.
सणांदरम्यान सोन्याची खरेदीची परंपरा खूप जुनी आहे आणि ग्राहक आजही याकडे समृद्धीचे प्रतीक म्हणून पाहतात. भाव वाढलेले असले तरी, खरेदीदार हलके दागिने, आधुनिक डिझाइन आणि हिर्यांनी जडवलेले दागिन्यांना अधिक पसंती लाभेल असे सराफ उद्योगाची संघटना ‘जीजेसी’चे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी व्यक्त केली.समृद्धी आणि सकारात्मक बदलाचे प्रतीक असलेल्या गुढीपाडव्याच्या सणाला गृहनिर्माण क्षेत्रातही विशेष स्थान आहे. यंदाही नव्या घराचे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न या शुभमुहूर्तावर केला जाणार आहे. त्याशिवाय वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीकडेही ग्राहकांचा अधिक ओढा असल्याचे दिसून येत आहे.
प्रबोधनात्मक स्वागतयात्रा
गुढीपाडवा म्हणजे नववर्षाच्या स्वागताचा प्रमुख सांस्कृतिक उत्सव. यंदाही प्रबोधनपर विषय घेऊन निघणार्या स्वागतयात्रा गुढीपाडव्याच्या आकर्षणाचे केंद्र असेल. ठाण्यात विविध संकल्पनेवर आधारित चित्ररथ तसेच सादरीकरण विविध संस्था करणार आहेत. ‘संस्कार भारती’च्या गावदेवी मैदानात ‘वंदे मातरम’चा १५० वर्षांचा ऐतिहासिक प्रवास साकारणारी महारांगोळी काढण्यात आली आहे. गिरगाव, दादर, डोंबिवली, कल्याण, बदलापूर या शहरांमध्ये विविध सामाजिक व प्रबोधनात्मक विषयांवर नववर्ष स्वागत चित्ररथ काढण्यात येणार आहेत.
