Gulab Cyclone: मुंबईसह राज्यात जाणवणार प्रभाव; दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

हवामान विभागाच्या मते, येत्या १२ तासात मुंबई आणि महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

Gulab cyclone effect Mumbai rains for two days
(प्रातिनिधीक छायाचित्र)

काही महिन्यांपूर्वी ‘यास’ वादळाने देशाच्या किनारपट्टी भागात कहर केला होता. त्यानंतर आता बंगालच्या उपसागरात आणखी एक नवीन वादळ तयार होत आहे. बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र शनिवारी खोल दाबामध्ये वाढल्याने रविवारी संध्याकाळपर्यंत ते चक्रीवादळात बदलण्याची शक्यता आहे. हवामानशास्त्रज्ञांच्या मते, गुलाब नावाचे हे चक्रीवादळ पुढील १२ तासात उत्तर आंध्र प्रदेश आणि लगतच्या दक्षिण ओडिशावरुन जाऊ शकते.

या चक्रीवादळाचा परिणाम राज्यासह मुंबईच्या हवामानात दिसून येईल. २७ आणि २८ सप्टेंबरला मुंबईत पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ञांनी वर्तवली आहे. याबाबत मुंबईकरांना सतर्क करण्यात आले आहे.

प्रादेशिक हवामान विभाग आयएमडी मुंबईच्या हवामान अधिकारी शुभांगी भुते यांनी सांगितले की, पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबासह राजस्थान आणि छत्तीसगडवर घोंघावत असलेल्या चक्रीवादळासारखी परिस्थिती मुंबई, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रावरही परिणाम करू शकते. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मान्सूनचा परिणाम राज्यावर दिसून येईल. काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या मते, येत्या १२ तासात मुंबई आणि महाराष्ट्रात वादळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचा परिणाम कोकण आणि मुंबईत दिसून येईल. पावसाची तीव्रता २६ सप्टेंबर ते २९ सप्टेंबरपर्यंत राहील.

गुलाब चक्रीवादळाचा प्रभाव २६ सप्टेंबरपासून मुंबईत दिसून येईल. रविवारी हलका पाऊस पडेल पण सोमवार आणि मंगळवारी मुंबईच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडेल. २७ आणि २८ सप्टेंबर रोजी मुंबईत वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल.

हवामान विभागाने महाराष्ट्र किनारपट्टीवरील मच्छीमारांसाठी देखील खोल समुद्रात जाण्याबाबत इशारा दिला आहे. ४५-५० किमी प्रतितास वेगाने वाहणारा वारा ६० किमी प्रतितास वेगाने वेगाने वाहण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबईची तहान भागवणाऱ्या तलाव हे एकूण ९९ टक्के भरले आहेत. त्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Gulab cyclone effect mumbai rains for two days abn