मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकेतील गुंदवली मेट्रो स्थानकातून बाहेर पडून पुढे पश्चिम द्रुतगती महामार्ग ओलांडून पुढे इच्छितस्थळी जाण्यासाठी प्रवाशांना बरीच कसरत करावी लागते. महामार्ग ओलांडून पुढे जाणे धोक्याचे असतानाही प्रवाशांना पर्याय नसल्याने अशाच प्रकारे ये-जा करावी लागते. पण आता मात्र प्रवाशांचीही गैरसोय लवकरच दूर होणार आहे. कारण गुंदवली मेट्रो स्थानकातून बाहेर पडून इच्छितस्थळी जाणे प्रवाशांना सोपे व्हावे यासाठी एमएमआरडीएने १६४ मीटर लांबीचा पादचारी पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. गुंदवली मेट्रो स्थानक (स्थानकाच्या उत्तरेच्या दिशेने) आणि द्रुतगती महामार्गाच्या पलीकडील भागाला जोडणाऱ्या या पादचारी पुलाच्या कामासाठी सल्लागार आणि कंत्राटदाराची नियुक्ती करण्यासाठी एमएमआरडीएने नुकत्याच निविदा मागविल्या आहेत.
एमएमआरडीएकडून १६.५ किमीची दहिसर पूर्व ते गुंदवली, अंधेरी पूर्व मेट्रो ७ मार्गिका टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली. तर ही मार्गिका जानेवारी २०२३ मध्ये पूर्ण क्षमतेने धावू लागली आणि या मार्गिकेतील शेवटचे गुंदवली स्थानक कार्यान्वित झाले. तर आता दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेतील दहिसर ते काशीगाव टप्पा सुरू झाल्याने गुंदवली ते काशीगाव असा मेट्रो प्रवास करता येत आहे. त्यामुळे या मार्गिकेवरून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
अशावेळी गुंदवली मेट्रो स्थानकातून बाहेर पडून द्रुतगती महामार्ग ओलांडून इच्छितस्थळी जाणे प्रवाशांसाठी गैरसोयीचे ठरत आहे. कारण स्थानकाबाहेरून महामार्गाच्या पलीकडे जाण्यासाठी भुयारी मार्ग, पूल वा इतर कोणतीही सुविधा नसल्याने प्रवाशांना महामार्ग ओलांडून, वाहतुकीतून मार्ग काढून पुढे जावे लागते. ही बाब लक्षात घेऊन अखेर गुंदवली मेट्रो स्थानक सेवेत दाखल होऊन पावणे चार वर्षे झाल्यानंतर एमएमआरडीएने प्रवाशांची ही गैरसोय दूर करण्याचा निर्णय घेतला आहे. गुंदवली स्थानकाला पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या पलीकडील भागाशी जोडण्यासाठी एमएमआरडीएने आता एक पादचारी पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
गुंदवली मेट्रो स्थानकाच्या उत्तर टोकाला उभारण्यात येणारा हा पूल मेट्रो मार्गिकांना समांतर जात द्रुतगती महामार्गावरून ओलांडून जोग उड्डाणपूल संपतो तिथे जाऊन संपणार आहे. १६४ मीटर लांबीच्या या पादचारी पुलाच्या कामासाठी सल्लागार आणि कंत्राटदाराची नियुक्ती करण्यासाठी नुकत्याच एमएमआरडीएने निविदा मागविल्या आहेत. तर निविदा प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर बांधकामास सुरुवात करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.
बांधकाम सुरू झाल्यापासून एका वर्षात काम पूर्ण करून हा पादचारी पूल सेवेत दाखल करण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. दरम्यान, गुंदवली मेट्रो स्थानकाच्या दक्षिण बाजूला एका पादचारी पुलाचे बांधकाम एमएमआरडीएकडून सुरू आहे. हा पूल गोल्डस्पॉट, बिस्लेरी फॅक्टरी जंक्शनपर्यंत असलेल्या उन्नत पादचारी मार्गाला जोडला जाणार आहे. त्यामुळे हा पूल सेवेत दाखल झाल्यास प्रवाशांना महामार्ग ओलांडून पुढे जाणे सोपे होणार आहे. तर उत्तरेकडील पादचारी पूल झाल्यास या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचीही सोय होणार आहे.
