एसटी कामगारांचे नेते आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबईत मोठी घोषणा केली. आगामी निवडणुकीत ‘कष्टकरी जनसंघ’ या त्यांच्या एसटी कामगारांच्या संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देण्याचं जाहीर केलं. तसेच पुढील निवडणुकीत मुंबईतील २४ हजार कष्टकरी शिंदे-फडणवीसांसाठी काम करतील, असं सांगितलं. ते शुक्रवारी (७ ऑक्टोबर) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “आम्ही मुख्यमंत्री शिंदेंना दोन गोष्टी अवगत केल्या. त्यांना सांगितलं की, कष्टकरी जनसंघ सर्वात बलशाली संघ आहे. तसेच आगामी निवडणुकीत मुंबईतील २४ हजार कष्टकरी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांसाठी काम करतील.”

“आझाद मैदानावर ५० हजार कष्टकऱ्यांचा मेळावा घेणार”

“आजच्या निर्णयाने आम्ही भारावून गेलो आहोत. आता त्याच आझाद मैदानावर ५० हजार कष्टकऱ्यांचा मेळावा घेण्यात येईल. त्या मेळाव्याला शिंदे आणि फडणवीसांनी उपस्थित रहावं. दोघांनीही आम्हाला त्यासाठी होकार दिला आहे,” असंही गुणरत्न सदावर्तेंनी सांगितलं.

“…म्हणून ११८ कामगारांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते”

यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी कारवाई झालेल्या ११८ कामगारांवरील कारवाई मागे घेण्यात आल्याची आणि पुन्हा सेवात घेतल्याचीही माहिती दिली. ते म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेण्यात आली. त्यांना कष्टकऱ्यांप्रती कळवळा आहे. त्यासाठी त्यांचे ऋण व्यक्त करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्या घरावर हल्ला केला म्हणून ११८ कामगारांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यावरून उद्धव ठाकरे सरकारने त्यांना नोकरीवरून काढलं होतं.”

हेही वाचा : तुम्ही स्वतः निवडणूक लढणार का? गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “आम्ही…”

“११८ कर्मचारीही डंके की चोटपर कामावर रुजू झाले”

“अजित पवार कायम म्हणत होते की या कामगारांचे गिरणी कामगार होतील. विरोधी पक्षाचे पुढारी अजित पवार यांनी बघावं की, एकूण ९२ हजार कष्टकऱ्यांचाही गिरणी कामगार झाला नाही आणि ११८ कर्मचारीही डंके की चोटपर कामावर रुजू झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशिर्वादाने अत्यंत सन्मानपूर्वक पुन्हा सेवेत आलेत,” असं गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gunratna sadavarte announce big decision about upcoming bmc election in mumbai pbs
First published on: 07-10-2022 at 21:00 IST