scorecardresearch

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंची १८ दिवसांनी तुरुंगातून सुटका, बाहेर पडताच म्हणाले, “हम है…”

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांची अखेर १८ दिवसांनी तुरुंगातून सुटका झाली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांची अखेर १८ दिवसांनी तुरुंगातून सुटका झाली आहे. त्यांनी तुरुंगातून सुटका होताच महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात दंड थोपटले आहेत. तसेच ‘हम है हिंदुस्थानी’, असं म्हणत ही आपली ताकद असल्याचं म्हटलं. यावेळी सदावर्ते यांची पत्नी आणि मुलगी त्यांना घेण्यासाठी ऑर्थर रोड जेलबाहेर आले होते.

मुंबई उच्च न्यायालयाने सदावर्ते यांना अटकपूर्व जामीन दिलाय. त्यामुळे आता पुणे पोलीस त्यांना अटक करणार नाहीत. यानंतर अटक झाल्यास २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिलेत.

“माझी हत्या झाली, तर आपण योग्य ती पावलं उचलावी”

गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “कष्टकरी चळवळीला मोडीत काढण्याचा प्रयत्न करू नका. असे गुन्हे दाखल केल्यानंतर शिखर निघत नसतं हे लक्षात राहू द्या, असं मी महाराष्ट्राच्या सरकारला आदरपूर्वक सांगतो. आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना मी विनंती करतो की माझी हत्या झाली, तर आपण योग्य ती पावलं उचलावी. ते घडण्याआधीही योग्य ती पावलं उचलावी.”

“मी जेलमधून सांगितलं होतं म्हणून एसटी कर्मचारी कामावर गेलेत”

“एसटी महामंडळातील कष्टकरी जे कामावर गेलेत ते काही कोणाच्या सांगण्यावरून गेले नाहीत. गुणरत्न सदावर्तेंनी जेलमधून सांगितलं होतं तूर्त कष्टकरी कर्मचाऱ्यांनी कामावर जावं. कारण माझे कष्टकरी ६ महिने दुखवट्यात होते. मी त्यांचं कोणतंही नुकसान होऊ दिलं नाही,” असंही सदावर्ते यांनी सांगितलं.

दरम्यान, मराठा समाज व मागासवर्गीय समाज यांच्या जातीय तेढ निर्माण करणारे चिथावणीखोर विधान केल्याप्रकरणी सदावर्ते यांना कोल्हापूर पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणी सोमवारी (२५ एप्रिल) कोल्हापूर न्यायालयाने सदावर्ते यांना पोलीस कोठडी ऐवजी न्यायालयीन कोठडी दिली होती.

“…म्हणून माझा खून होत नाही”

यानंतर माध्यमांशी बोलताना सदावर्ते यांनी आपण राजर्षी शाहू, डॉ. आंबेडकर यांच्या विचाराचे वंशज असल्याचा दावा केला होता. चौथा स्तंभ पाठीशी असल्यामुळे माझा खून होत नाही, असंही सदावर्ते म्हणाले होते. कोल्हापूर पाठोपाठ पुणे पोलीस सदावर्ते यांना अटक करणार आहेत. यावरून जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे का, असे विचारले असता सदावर्ते यांनी संविधानाची शक्ती त्रास बाजूला ठेवते असे मत व्यक्त केले होते.

दोन वर्षांपूर्वी गुणरत्न सदावर्ते यांनी एका खासगी न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत छत्रपती उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात संतप्त भावना निर्माण झाली होती.

हेही वाचा : गुणरत्न सदावर्ते यांना कोल्हापूर न्यायालयाकडून काहिसा दिलासा; प्रतिक्रिया देत म्हणाले, “…म्हणून माझा खून होत नाही”

दरम्यान, सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये राजेंद्र निकम यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. ऑक्टोबर २०२० मध्ये दाखल गुन्ह्याच्या चौकशीसाठी सदावर्ते यांना बोलावण्यात आलं होतं. मात्र, ते गैरहजर राहिल्यानं सातारा शहर पोलिसांनी या प्रकरणात ताबा मिळण्यासाठी गिरगाव न्यायालयात अर्ज केला होता. तो अर्ज न्यायालयाने मंजूर केला होता. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मुंबई, सातारा, कोल्हापूरनंतर बीडमध्येही गुन्हे दाखल झाले आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gunratna sadavarte released from arthur road jail after 18 days pbs

ताज्या बातम्या