गुरुदास कामत यांनी राजकारण संन्यास मागे घेतलाच तर त्यांना पक्षाच्या कारभारात महत्त्व दिले जाईल का, याकडे पक्षाच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. आपल्या राजीनाम्याच्या निषेधार्थ कोणीही आंदोलन करू नये वा राजीनामे देऊ नये, असे आवाहन कामत यांनी केल्याने तेसुद्धा फार ताणण्यास उत्सुक दिसत नाहीत.
कामत यांच्याशी संपर्क झालेला नसला तरी ते आज नवी दिल्लीला गेल्याचे समजते, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. कामत यांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घ्यावा म्हणून १०, जनपथवरून प्रयत्न सुरू झाले आहेत. पक्षाला आधीच गळती लागली असताना कामत यांच्यासारखा धडपडय़ा नेता पक्षाबाहेर जाणे योग्य ठरणार नाही, असा काँग्रेसमध्ये मतप्रवाह आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी आपल्या समर्थकांना पद्धतशीरपणे डावलल्याने कामत संतप्त झाले आहेत. दिल्ली भेटीत कामत यांच्या कोणत्या मागण्या मान्य केल्या जातात, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे. निरुपम यांना पदावरून दूर करण्याची मागणी कामत यांच्याकडून केली जाऊ शकते. राहुल गांधी यांचा निरुपम यांना पाठिंबा असल्याने तसेच काँग्रेसमध्ये दबावाचे राजकारण सहन केले जात नसल्याने ही मागणी मान्य होण्याबाबत साशंकता आहे. मुंबईतील पक्षाच्या कारभारात समर्थकांना सामावून घेण्याबरोबरच आगामी निवडणुकीत उमेदवारी देण्याचे आश्वासन कामत यांना दिले जाऊ शकते.
कामत राजीनाम्याचा निर्णय मागे घेण्याची शक्यता कमी आहे. मात्र पक्षाने झुकते माप दिल्यास काँग्रेस सोडणार नाही, पण पद स्वीकारणार नाही, अशी भूमिका कामत घेण्याची शक्यता आहे. कामत समर्थकांनी मुंबई काँग्रेसच्या मुख्यालयासमोर निदर्शने केली. मुंबई अध्यक्ष निरुपम यांच्यावर या समर्थकांचा रोख होता. मुंबईच्या पक्ष संघटनेत कामत यांचे महत्त्व कायम ठेवावे आणि त्यांचा सन्मान करावा, अशा मागणीचे पत्र खासदार हुसेन दलवाई यांनी पक्षाध्यक्षांना दिले आहे.