प्रवेश रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांना बोलावणे

पालकांनी चर्नीरोड येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे सोमवारी धाव घेतली.

(संग्रहित छायाचित्र)

कल्याणमधील महाविद्यालयात अकरावीत अवघ्या सहा विद्यार्थ्यांचा प्रवेश

कल्याणमधील गुरुकृपा महाविद्यालयामध्ये अकरावीसाठी फक्त सहा प्रवेश झाल्याने यंदा महाविद्यालयाने प्रवेशित विद्यार्थ्यांना महाविद्यालय सुरू होणार नसल्याचे कारण देत प्रवेश रद्द करण्यासाठी बोलावले आहे. इतक्या कमी विद्यार्थ्यांसाठी वर्ग भरविणे परवडणारे नसल्याने महाविद्यालयाने हा निर्णय घेतला आहे. या विद्यार्थ्यांचे प्रवेश जुलै महिन्यामध्ये झाले असून जवळपास महिनाभराने त्यांना प्रवेश रद्द करण्याबाबत सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे आता कुठे प्रवेश घ्यायचा याची चिंता पालक आणि विद्यार्थ्यांना लागली आहे. या संदर्भात तक्रार घेऊन आलेल्या पालकांना शिक्षण उपसंचालक  कार्यालयातूनही योग्य सूचना मिळत नसल्याने आता करायचे काय, असा प्रश्न या पालकांपुढे निर्माण झाला आहे.

कल्याणच्या पश्चिम भागातील गुरुकृपा महाविद्यालयाने यंदाच अकरावीचे वर्ग सुरू करण्यासाठी मान्यता मिळवली आहे. परंतु ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये या महाविद्यालयासाठी चौथ्या फेरीपर्यंत फक्त सहा विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. यामध्ये कला शाखेत चार तर वाणिज्य आणि विज्ञान शाखेत प्रत्येकी एका विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दिव्याला राहणारी साक्षी वेंगुर्लेकर हिला दुसऱ्या फेरीमध्ये गुरुकृपा महाविद्यालय मिळाले होते. तिला ४५ टक्के असल्याने पुढच्या फेऱ्यांमध्ये प्रवेश मिळेल की नाही याबाबत शाश्वती नसल्याने तिने या महाविद्यालयात २२ जुलै रोजी प्रवेश निश्चित केला. परंतु, ‘या वर्षी महाविद्यालयात वर्ग भरविण्यात येणार नाहीत. तेव्हा प्रवेश रद्द करुन घ्या,’ असे महाविद्यालयाकडून तिला ११ ऑगस्ट रोजी कळविण्यात आले. या संदर्भात प्रत्यक्ष महाविद्यालयात संपर्क साधला असता, महाविद्यालयाच्या उभारणीचे काम वेळेत पूर्ण न झाल्याने महाविद्यालय सुरू करण्यात येणार नसल्याचे कारण त्यांना देण्यात आले.

याबाबत तक्रार करण्यासाठी साक्षीच्या पालकांनी चर्नीरोड येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे सोमवारी धाव घेतली. परंतु इथेही त्यांना ‘तक्रार अर्ज देऊन ठेवा, तुमचा प्रवेश केला जाईल’ या तोंडी आश्वासनाव्यतिरिक्त हाती काही लागलेले नाही. ‘प्रवेश झाल्याने आम्ही निश्चिंत होतो. परंतु महाविद्यालयाकडून अचानक प्रवेश रद्द करा, असे सांगण्यात आल्याने आम्हाला धक्काच बसला आहे. आता चारही प्रवेश फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. या गोंधळामुळे आम्ही खास फेरीसाठीही अर्ज करू शकलो नाही. त्यामुळे आता तिला कोणते महाविद्यालय मिळाणार, याची चिंता आम्हाला लागली आहे,’ असे साक्षींच्या पालकांनी सांगितले आहे.

‘महाविद्यालय नवीन असल्याने फक्त सहाच प्रवेश झालेले आहेत. तेव्हा केवळ सहा विद्यार्थ्यांसाठी वर्ग भरविणे आम्हाला परवडणारे नाही. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून आम्ही त्यांना प्रवेश रद्द करण्यास सांगितले आहे. त्यामुळे पुढच्या फेरीमध्ये तरी त्यांना प्रवेश मिळू शकेल. तसेच या विद्यार्थ्यांना कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही तर अधिकृतरीत्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश द्यावा, अशी मागणी आम्ही शिक्षण उपसंचालकांना केली आहे,’ असे गुरुकृपा महाविद्यालयाचे संस्थाचालक पंकज वीर यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Gurukrupa college call students to cancel admission

ताज्या बातम्या