मुंबई : शासनाने कर्मचाऱ्यांना सेवाकाळात दोन ते तीन वेळा पदोन्नती देण्यासाठी जाहीर केलेल्या आश्वासित प्रगती योजनेपासून अनेक वर्षे हाफकिन महामंडळातील कर्मचारी वंचित आहे. अखेर ही योजना त्यांनाही लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे हाफकिन महामंडळाच्या मुंबई व पिंपरी येथील आस्थापनांमध्ये कार्यरत जवळपास १९५ कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ मिळणार आहे. ही योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येत असली तरी सध्या येत्या वेतनापासून लागू करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.
हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळातील काही एकाकी पदे व काही अधिकारी व कर्मचारी यांना पदोन्नतीच्या संधी नसल्यामुळे महामंडळातील अधिकारी व कर्मचारी अनेक वर्षांपासून एकाच पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्या सेवेत कुंठितता आली आहे. या अधिकारी व कर्मचारी यांना १२ आणि २४ वर्षांची ‘सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना’ व ‘सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना’ लागू करण्याबाबत कर्मचारी संघटनांकडून वारंवार आंदोलन करण्यात आले. २०१० पर्यंत हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळातील कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत होता. परंतु त्यावेळी लेखा परीक्षा अधिकारी यांनी या योजनेमुळे महामंडळावर वार्षिक १३ कोटी ५७ लाख रुपये आर्थिक भार पडणार असल्याचे कारण देत ही योजना बंद केली. या निर्णयामुळे हाफकिन महामंडळातील जवळपास १९५ कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित राहिलेत.
आश्वासित प्रगती योजना लागू केल्यानंतर पडणारा आर्थिक भार पेलण्याची तयारी हाफकिन महामंडळाने दाखविल्यानंतर त्यावर वित्त विभागाकडून कोणतेही उत्तर आले नाही. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीदरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हाफकिन महामंडळातील कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचे आश्वासन दिले. मात्र निवडणुकीनंतर हे आश्वासन हवेत विरले. त्यामुळे हाफकिन महामंडळातील कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली होती.
पदोन्नती व वेतनवाढीचा मार्ग मोकळा
कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या मान्यताप्राप्त संघटनांची विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्यासोबत नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये हाफकिन महामंडळातील अधिकारी व कर्मचारी यांना १२ व २४ वर्षांची ‘सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना’ व ‘सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना’ पूर्वलक्षी प्रभावाने त्वरित लागू करण्याबाबत निर्देश दिले. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने सादर केलेल्या प्रस्तावाला व्यवस्थापकीय संचालकांकडून मान्यता देण्यात आली. त्यामुळे जवळपास १६ वर्षांपासून आश्वासित प्रगती योजनेअभावी पदोन्नतीपासून वंचित असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती व वेतनवाढीचा मार्ग मोकळा झाला आहे.
योजना तातडीने लागू करण्याचे प्रयत्न
आश्वासित प्रगती योजना लागू केल्याने जवळपास १९५ कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार असून, महामंडळाला दरमहा साडेपाच लाख रुपयांचा भार सहन करावा लागणार आहे. ही योजना तातडीने लागू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच महामंडळाची आर्थिक परिस्थिती अधिक सक्षम झाल्यावर लाभार्थी अधिकारी व कर्मचारी यांना मिळणारी थकबाकी देण्यात येणार आहे. या निर्णयाला कर्मचारी व अधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे. – रमेश चव्हाण, व्यवस्थापकीय संचालक, हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ
