Hafkin institute ready for examination of samples of measles patients mumbai | Loksatta

मुंबई : गोवर रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासणीसाठी हाफकीन तयार

मुंबईसह राज्यात वाढत असलेला गोवरचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने राज्य कृती दलाची स्थापना केली आहे. या कृती दलाने गोवर रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी आणि संशोधन करण्यावर भर देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

मुंबई : गोवर रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासणीसाठी हाफकीन तयार
गोवर रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासणीसाठी हाफकीन तयार

राज्य कृती दलाने गोवरला प्रतिबंध करण्यासाठी राज्यातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये गोवरच्या रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी अद्ययावत प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. गोवर रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी आम्ही तयार असून आमच्याकडे सर्व सुविधा उपलब्ध असल्याचे हाफकीन संस्थेकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे राज्य सरकारने जबाबदारी सोपवल्यास यापुढे गोवर रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी हाफकीनमध्ये करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

हेही वाचा- ‘शिंदे सरकार नामर्द आहे’ म्हणणाऱ्या संजय राऊतांना बावनकुळेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “जेलमध्ये राहिल्याने…”

मुंबईसह राज्यात वाढत असलेला गोवरचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने राज्य कृती दलाची स्थापना केली आहे. राज्य कृती दलाने १० कलमी कार्यक्रम जाहीर करून गोवर रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी आणि संशोधन करण्यावर भर देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सध्या राज्यामध्ये गोवरच्या रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी कोणतीही प्रयोगशाळा उपलब्ध नाही. त्यामुळे राज्यातील महत्त्वाच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये तातडीने प्रयोगशाळा उभारण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच अन्य महाविद्यालयांमध्ये उपलब्ध पायाभूत सुविधा पाहून प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. एकीकडे राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रयोगशाळा उभारण्यावर भर दिला जात असताना विविध रोगांवर संशोधन करणाऱ्या हाफकीन संस्थेने गोवरच्या रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी व संशोधन करण्याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे.

हेही वाचा- मुंबई: अध्ययन अक्षमता असलेल्या विद्यार्थ्याला उच्च न्यायालयाचा दिलासा

गोवरच्या रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा हाफकीन संस्थेकडे उपलब्ध आहेत. राज्य सरकारने जबाबदारी सोपवल्यास आम्ही गोवर रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी, तसेच संशोधन करण्यावर भर देऊ, असे हाफकीनचे प्रभारी मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि शास्त्रज्ञ डॉ. उषा पद्मनाभन यांनी सांगितले. विविध साथरोगांवर संशोधन करण्यासाठी राज्यामध्ये हाफकीनसारखी अद्ययावत संस्था आहे. असे असतानाही गोवरला प्रतिबंध करण्याच्या प्रक्रियेत राज्य सरकार हाफकीनला दूर ठेवत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हाफकीनवर योग्य जबाबदारी सोपावल्यास गोवर विरोधातील लढा अधिक प्रभावीपणे लढणे शक्य होणार आहे.

हेही वाचा- गोवर लसीकरण मोहीम दोन टप्प्यांत

गोवर रुग्णांच्या नमुन्यांच्या तपसाणीबाबत अद्याप हाफकीनकडे विचारणा झालेली नाही. गोवरच्या रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी करण्यासंदर्भातील सर्व सुविधा हाफकीनकडे उपलब्ध आहे. आम्हाला विचारणा झाल्यास तपासणी करण्याची आमची तयारी आहे, अशी माहिती हाफकीन संस्थेचे शास्त्रज्ञ आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. उषा पद्मनाभन यांनी दिली

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 14:32 IST
Next Story
मुंबई: कुर्ला, सीएसएमटी, दादर रेल्वे स्थानकांवर हल्ला करण्याची धमकी