scorecardresearch

गोवर रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासणीसाठी हाफकीन तयार

राज्य कृती दलाने गोवरला प्रतिबंध करण्यासाठी राज्यातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये गोवरच्या रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी अद्ययावत प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

गोवर रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासणीसाठी हाफकीन तयार
लोकसत्ता ग्राफिक्स टीम

मुंबई : राज्य कृती दलाने गोवरला प्रतिबंध करण्यासाठी राज्यातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये गोवरच्या रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी अद्ययावत प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. गोवर रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी आम्ही तयार असून आमच्याकडे सर्व सुविधा उपलब्ध आहेत, असे हाफकीन संस्थेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्य सरकारने जबाबदारी सोपवल्यास यापुढे गोवर रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी हाफकीनमध्ये करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

 मुंबईसह राज्यात वाढत असलेला गोवरचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने राज्य कृती दलाची स्थापना केली आहे. राज्य कृती दलाने १० कलमी कार्यक्रम जाहीर करून गोवर रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी आणि संशोधन करण्यावर भर देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सध्या राज्यात गोवरच्या रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी कोणतीही प्रयोगशाळा उपलब्ध नाही. त्यामुळे राज्यातील महत्त्वाच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये तातडीने प्रयोगशाळा उभारण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच अन्य महाविद्यालयांमध्ये उपलब्ध पायाभूत सुविधा पाहून प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे.

गोवरच्या रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा हाफकीन संस्थेकडे उपलब्ध आहेत. राज्य सरकारने जबाबदारी सोपवल्यास आम्ही गोवर रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी, तसेच संशोधन करण्यावर भर देऊ, असे हाफकीनच्या प्रभारी मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि शास्त्रज्ञ डॉ. उषा पद्मनाभन यांनी सांगितले.

गोवर रुग्णांच्या नमुन्यांच्या तपसाणीबाबत अद्याप हाफकीनकडे विचारणा झालेली नाही. गोवरच्या रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी करण्यासंदर्भातील सर्व सुविधा हाफकीनकडे उपलब्ध आहे. आम्हाला विचारणा झाल्यास तपासणी करण्याची आमची तयारी आहे.

– डॉ. उषा पद्मनाभन, शास्त्रज्ञ आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी (प्रभारी), हाफकीन संस्था

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 00:52 IST

संबंधित बातम्या