राज्यात अभियांत्रिकीच्या दीड लाख जागा रिकाम्या | Loksatta

राज्यात अभियांत्रिकीच्या दीड लाख जागा रिकाम्या

महाराष्ट्रात यंदा अभियांत्रिती व पदविका अभियांत्रिकीच्या विक्रमी जागा रिकाम्या राहिल्या

राज्यात अभियांत्रिकीच्या दीड लाख जागा रिकाम्या
Photocopying books : विद्यापीठाकडून व्यावसायिक हेतूसाठी झेरॉक्सवाल्यांचा उपयोग केला जात असल्याचा आक्षेप प्रकाशकांकडून नोंदविण्यात आला होता. मात्र, न्यायालयाने कॉपाराईट कायद्यातील तरतुदींचा दाखला देत प्रकाशकांची मागणी फेटाळून लावली.

महाराष्ट्रात यंदा अभियांत्रिती व पदविका अभियांत्रिकीच्या विक्रमी जागा रिकाम्या राहिल्या असून याला ‘अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदे’ने (एआयसीटीई) खिरापतीसारखी वाटलेली महाविद्यालये व अभ्यासक्रम जबाबदार आहेत. ‘एआयसीटीई’ प्रमाणेच तंत्रशिक्षण मंत्रालयानेही गेल्या काही वर्षांत सातत्याने रिकाम्या जागांचे प्रमाण लक्षात घेऊन निर्णायक भूमिका न घेतल्यामुळे यंदा पदिविका अभियांत्रिकीच्या ८९,३९९ जागा रिकाम्या राहिल्या तर पदवीच्या ६४,४१८ जागा रिकाम्या राहिल्या आहेत.

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी शिक्षणाचा आढावा घेऊन उपाययोजना सुचविण्यासाठी आघाडी सरकारच्या काळात डॉ. गणपती यादव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल शासनाने स्वीकारला असून या अहवालात राज्यातील नव्वद टक्के अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये अपुरे शिक्षक तसेच पायाभूत सुविधा नसल्याचे जसे म्हटले आहे तसेच निम्मी महाविद्यालये बंद करण्याची शिफारसही केली होती. तथापि ही शिफारस धाब्याबर बसवून ‘एआयसीटीई’ने वारेपाम महाविद्यालये तसेच अभ्यासक्रमांना मान्यता देण्याची बेबंदशाही चालविली. एकीकडे दर्जा व पायाभूत सुविधा नाहीत तर दुसरीकडे नोकरीची शाश्वती नसल्यामुळे गेल्या काही वर्षांत अभियांत्रिकीच्या जागा मोठय़ा संख्येने रिकाम्या राहू लागल्या.

जवळपास निम्म्या महाविद्यालयांतील अनेक अभ्यासक्रमांमध्ये गेल्या पाच वर्षांत जेमतेम ३५ टक्के प्रवेश भरल्याचे दिसून आल्यानंतर हे अभ्यासक्रम बंद करणे अथवा तेथील प्रवेश क्षमता निम्म्याने कमी करण्याचा निर्णय ‘एआयसीटीई’ घेणे अपेक्षित होते. राज्यातील बहुतेक महाविद्यालयांचे प्राचार्य आपल्या महाविद्यालयात सर्वपायाभूत सुविधा असल्याचे तसेच शिक्षकांची सर्व पदे भरण्यात येत असल्याची खोटी प्रतिज्ञापत्रे वर्षांनुवर्षे ‘एआयसीटीई’ला देऊन फसवणूक करण्याचे काम करत आहेत. एआयसीटीईचे अध्यक्ष अनिल सहस्त्रबुद्धे यांना तसेच तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांना याची संपूर्ण कल्पना असतानाही आजपर्यंत या खोटारडय़ा प्राचार्यावर कोणताही कारवाई केलेली नाही. अभियांत्रिकीचा घसरलेला दर्जा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी अन्य अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याला पसंती दिल्याचे काही ज्येष्ठ अध्यापकांचे म्हणणे आहे. गंभीरबाब म्हणजे विनाअनुदानित पदवी अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील ४७ टक्के जागा रिकाम्या राहिल्या आहेत तर पदविकेच्या जागा रिकाम्या राहण्याचे प्रमाण ६२ टक्के एवढे भयावह असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. सातत्याने अभियांत्रिकीच्या जागा रिकाम्या राहण्याचे प्रमाण लक्षात घेऊन ज्या महाविद्यालयांमध्ये गेली पाच वर्षे ३५ टक्क्यांपेक्षा कमी प्रवेश भरले गेले आहेत तेथील संबंधित अभ्यासक्रमाच्या जागा पन्नास टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेण्याची शिफारस तंत्रशिक्षण संचालनालयाकडून एआयसीटीईला करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

यंदा गेल्या काही वर्षांतील रिकाम्या जागांचे सर्व विक्रम मोडून अभियांत्रिकी पदवीच्या एकूण १,४३,८५३ जागांपैकी तब्बल ६४ हजार ४१८ जागा रिकाम्या राहिल्या तर पदविकेच्या १,५९,८०४ जागांपैकी ८९,३९९ जागा भरल्या नाहीत. आयटी, कॉम्युटर, इलेट्रॉनिक अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन, सिव्हिल इंजिनियरिगच्या जागा रिकाम्या राहण्याचे प्रमाण वाढले आहे. राज्यात अभियांत्रिकीची ३६५ महाविद्यालये आहेत तर पदविका अभियांत्रिकीती ४७३ महाविद्यालये आहेत.

 

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-09-2016 at 01:03 IST
Next Story
माहीममध्ये तरुणाकडून पत्नीची हत्या