मुंबई : मुंबईतील हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळाने तीन वर्षांमध्ये आशिया, अफ्रिका आणि लॅटिन अमेरिका खंडातील ४५ देशांना विविध औषधे निर्यात करुन तीन वर्षांत देशाला १३७ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळवून दिल्याची दखल घेत राज्य सरकारने मंडळाला ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट निर्यातदार २०१८’ च्या पुरस्काराने सन्मानित केले आहे.

हाफकिन महामंडळामध्ये पोलिओ लस, कफ-खोकल्यावरील कॉफेफीन कफ सिरप, अतिसारावरील मेट्रेकिन सिरप, पोटातील जंतू आणि कृमीनाशक अल्बेकिन सिरप इत्यादी जीवरक्षक औषधांचे उत्पादन केले जाते. याव्यतिरिक्त सर्पदंश, विंचूदंश, श्वानदंश प्रतिविषही तयार केले जाते. ‘मानव सेवेत सर्मपित’ या ब्रीद वाक्यानुसार कार्यरत असलेले हाफकिन महामंडळ विविध औषधांचा पुरवठा माफक दरात करते. हाफकिनने २०१५ ते २०१८ या काळात श्रीलंका, लिबिया, युंगाडा, घाना, अफगणिस्तान, पाकिस्तान इत्यादी ४५ देशांना सुमारे १३७ कोटी रुपयांचा औषध पुरवठा केला आहे. यासाठी राज्य सरकारने हा पुरस्कार महामंडळाला दिला आहे. हा पुरस्कार प्राप्त करणारी हाफकिन ही पहिली सरकारी संस्था आहे.