चार पूल पावसाळ्याआधी पाडणार
रेल्वेच्या वाहतुकीत अडथळा ठरणाऱ्या हँकॉक पुलाचा निकाल लावल्यानंतर आता मध्य रेल्वेने चार पुलांवर हातोडा चालवण्याची तयारी सुरू केली आहे. यापैकी मशीद स्थानकाजवळील कारनॅक पुलाचा क्रमांक सर्वात आधी लागणार असून फेब्रुवारीच्या मध्यात हा पूल तोडण्याचे नियोजन मध्य रेल्वेने केले आहे. त्याशिवाय दोन पुलांची उंची वाढवण्याचे कामही मध्य रेल्वे हाती घेणार असून हे कामदेखील पावसाळ्याआधी पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार आहे.
मध्य रेल्वेवर डीसी-एसी परिवर्तनाचे काम पूर्ण झाल्यानंतर विविध पुलांखाली उंचीअभावी वेगमर्यादा लावण्यात आली. या वेगमर्यादेमुळे मध्य रेल्वेवरील गाडय़ांचा वेग कारनॅक पूल, चामर लेन पादचारी पूल (भायखळा), कुर्ला स्वदेशी मिल पादचारी पूल, पंतनगर पादचारी पूल (घाटकोपर), करी रोड पूल आणि टिळक पूल या पट्टय़ात ताशी १५ ते ३० किमी एवढाच राहिला आहे. याचा परिणाम मध्य रेल्वेच्या वेळापत्रकावरही काही प्रमाणात झाला आहे.
त्याशिवाय करी रोड येथील पूल आणि दादर येथील टिळक पूल यांची उंची वाढवण्याचे कामही हाती घेण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी दिली.
या पाडकामातील पहिले पाडकाम फेब्रुवारी महिन्यात सुरू होणार असून या वेळी कारनॅक पुलावर रेल्वेचा हातोडा चालणार आहे. सँडहर्स्ट रोडपासून कमी होणारा गाडय़ांचा वेग या ब्रिटिशकालीन पुलाचे पाडकाम झाल्यानंतर वाढणार आहे. मात्र याबाबत वाहतूक शाखेकडे विचारणा केली असता, रेल्वेकडून अद्यापही प्रस्ताव आला नसल्याचे वाहतूक शाखेतील सूत्रांनी सांगितले.

* गाडय़ांच्या वेगाप्रमाणेच या सर्व ठिकाणी संबंधित पुलांमुळे रेल्वे मार्गावर पाणी साचण्याचे प्रकारही पावसाळ्यात घडतात. यापैकी
कोही पुलांची उंची वाढवल्यानंतर ही समस्या उद्भवणार नसल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
* कारनॅक पूल, चामर लेन पादचारी पूल, स्वदेशी मिल पादचारी पूल आणि पंतनगर पादचारी पूल हे चार पूल पावसाळ्याआधीच पाडण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.