मुंबई : दक्षिण मुंबईतील हँकाक पुलाचे बांधकाम मागील दहा वर्षांपासून रखडले आहे. आतापर्यंत फक्त चाळीस टक्केच काम पूर्ण झाले असून पुलाचे काम अर्धवट असल्याने रहिवाशांना रेल्वे रुळ ओलांडावे लागतात. त्यात आतापर्यंत २० जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या पुलाचे काम रखडल्याने बांधकामाचा खर्च तब्बल ६१ कोटी रुपयांनी वाढल्याचा आरोप काँग्रेसच्या अमीन पटेल यांनी गुरुवारी विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे केला. त्यावर शासनाने दखल घेण्याचे निर्देश तालिका अध्यक्षांनी दिले.

दक्षिण मुंबईत सँडहर्स्ट रोडजवळ हँकाँक पूल आहे. २०१५ मध्ये मुंबई महापालिकेने हा पूल धोकादायक जाहीर करून २०१६मध्ये तोडला. गेल्या १० वर्षात या पुलाचे काम फक्त चाळीस टक्के झाले. ऑगस्ट २०२२ मध्ये या पूलाच्या दोन लेन सुरु झाल्या. पण २०१६ ते २०२२ या कालावधीत या पुलावर १५ ते २० नागरिकांचा रेल्वे रुळ ओलांडताना दुर्देवी मृत्यु झाला. २०१८ मध्ये मुंबई महापालिकेने मुंबई उच्च न्यायालयामध्ये लेखी स्वरुपात हमी दिली होती की २०१९मध्ये हा पूल पूर्ण होईल. मात्र, अद्याप या पुलाचे ६० टक्के काम अपूर्णच आहे, अशी माहिती पटेल यांनी दिली.

या पूलाच्या बांधकामासाठी तेव्हा १४ कोटी रुपये लागणार होते. पण आतापर्यंत ७५ कोटी रुपये खर्च झाले आहेत. आता यावर्षीचा जून महिना संपत आला आहे. पण तरीही या पूलाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी मुंबई महापालिकेकडे कोणतीही योजना नाही. मुंबादेवी आणि भायखळा मतदारसंघाला जोडणारा हा पूल आहे. या भागात सात शाळा आहेत. या शाळांमधील विद्यार्थ्यांना ये जा करताना प्रचंड त्रास होत असून येथे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे, महापालिका, म्हाडाच्या अधिकाऱ्यांची त्वरीत एक बैठक आयोजित करण्यात यावी आणि या पुलाचे काम त्वरीत मार्गी लावावे, अशी मागणी पटेल यांनी केली.