मुंबई : मुंबईतील वरळी येथील हॅपी होम अँड स्कुल फॉर दि ब्लाईंड संस्थेच्या अंध विद्यार्थ्यांनी माध्यम शालान्त परीक्षेत यश मिळवत मागील १०० वर्षांपासूनची १०० टक्के निकालाची परंपरा अबाधित राखली. संस्थेतील पाचही अंध विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. वर्षभर विविध कलांचे शिक्षण घेत आपले छंद जोपासणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासातही उत्कृष्ट प्रगती करत इतर अंध विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठेवला आहे.
हॅपी होम अँड स्कुल फॉर दि ब्लाईंड संस्थेतील पाच विद्यार्थी मार्च २०२५-२६ च्या माध्यमिक शालान्त परीक्षेला बसले होते. हे पाचही विद्यार्थी प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण झाले असून यामुळे शाळेत सध्या आनंदाचे वातावरण आहे. या विद्यार्थ्यांपैकी उमेर शेख ९० टक्के गुण मिळवून संस्थेत प्रथम आला असून इस्माईल शेख, ओम राऊत, इब्राहिम हुसेन आणि शाह आलम खान या विद्यार्थ्यांनीही ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळवत यश मिळविले. अंधत्वावर मात करत केवळ मेहेनत आणि जिद्दीच्या जोरावर विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे.
अंध विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने १९२५ साली वरळी येथे हॅपी होम अँड स्कुल फॉर दि ब्लाईंड या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. संस्थेच्या शंभर वर्षांच्या वाटचालीत अनेक विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य संस्थेने केले.
शिक्षणासोबतच अंध विद्यार्थ्यांना विविध कला, तसेच क्रीडा प्रकारांची गोडी लागावी तसेच त्यातून त्यांना आपला छंद विकसित करण्याच्या उद्देशाने तसेच भविष्याचा विचार करता त्यांच्यात कौशल्ये विकसित व्हावी यासाठी प्रशिक्षण दिले जाते. यात पोहोणे, योगा, जुडो, रोप मल्लखांब यांसह विविध कलांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येते. तसेच संस्थेत वस्तीगृहाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. अंध विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी संस्थेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही केले जाते, अशी माहिती संस्थेच्या संचालक मेहर बनाजी यांनी दिली.
हॅपी होम अँड स्कुल फॉर दि ब्लाईंड ही संस्था मागील १०० वर्षांपासून अंध विद्यार्थ्यांसाठी कार्य करते आहे. या संस्थेतील अनेक विद्यार्थ्यी विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी करत आहेत. आमच्या संस्थेत १०० टक्के निकालाची परंपरा मागील १०० वर्षांपासून आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांसह संस्था कायमच प्रयत्नशील असते. – मेहेर बनाजी, संचालक, हॅपी होम अँड स्कुल फॉर दि ब्लाईंड.
