मुंबई : केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दरवर्षीप्रमाणे यंदाही भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ९ ते १७ ऑगस्ट दरम्यान ‘घरोघरी तिरंगा’ अर्थात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येणार असून ‘वंदे मातरम्’ या गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणारे विविध देशभक्तीपर उपक्रम यंदाच्या अभियानाचे विशेष आकर्षण ठरणार आहेत.

या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेतर्फे मुंबईत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवून या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

केंद्र सरकार २०२२ पासून ‘घरोघरी तिरंगा’ अर्थात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवित आहे. यंदा ‘वंदे मातरम्’ या गीताला १५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने नागरिकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे तसेच भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल जागरुकता वाढविण्यासाठी देशभर विविध उपक्रम राबविले जात आहेत. या अंतर्गत मुंबई महानगरपालिकेच्या वतीनेही विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत ‘घरोघरी तिरंगा’ अभियान राबविले जाणार आहे. मुंबई महानगरातही हे अभियान व्यापकपणे आणि अत्यंत उत्साहात राबविण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले.

‘घरोघरी तिरंगा’ अभियानाअंतर्गत मुंबई महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभागांमध्ये तिरंगा रॅली आणि ई-बाइक रॅली, वंदे मातरम् प्रदर्शन, मातरम् रांगोळी आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच, महानगरपालिका शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित केले जातील, ज्यामध्ये ‘वंदे मातरम्’ गीत गायन करण्यात येणार आहे.

नागरिकांनी राष्ट्रध्वजासोबत सेल्फी काढून https://harghartiranga.com या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करावी. यावर्षी सेल्फीसोबत ‘वंदे मातरम्’ गीताचे बोल असलेली विशेष चित्रफित सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या अभियानाबाबत अधिक माहितीसाठी आणि स्वयंसेवक नोंदणीसाठी https://harghartiranga.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. मुंबईतील नागरिकांनी या राष्ट्रीय अभियानात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.