मुंबई : हार्बर मार्गावरील शिवडी रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक २ जवळ ओव्हरहेड वायरवर कपडा अडकल्याने शनिवारी सकाळी हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. या तांत्रिक बिघाडामुळे पनवेल – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) दरम्यान धावणाऱ्या लोकल विविध स्थानकांवर थांबवण्यात आल्या. परिणामी, प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, शिवडी रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक २ जवळ शनिवारी सकाळी ९.४४ च्या सुमारास ओव्हरहेड वायरवर कपडा अडकल्याचे निदर्शनास आले. ओव्हरहेड वायरमध्ये कपडा अडकल्याने विद्युतपुरवठा आणि लोकलच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाला तातडीने खबरदारी घ्यावी लागली. परिणामी, अप हार्बर मार्गावरील लोकल सेवेवर परिणाम झाला. पनवेलहून सीएसएमटीच्या दिशेने येणाऱ्या लोकल विविध स्थानकांवर थांबवण्यात आल्या. त्यामुळे या मार्गावर लोकलची रांग लागली होती.
घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीची कार्यवाही सुरू केली. ओव्हरहेड वायरवर अडकलेला कपडा हटवण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सकाळी १०.१३ वाजता रेल्वे प्रशासनाने मार्ग वाहतुकीसाठी खुला केला. सुमारे २९ मिनिटांच्या खोळंब्यानंतर लोकल सेवा पुन्हा सुरू झाली. मात्र, विविध स्थानकांवर थांबलेल्या गाड्यांमुळे वाहतूक पूर्वपदावर येण्यास काही काळ लागला. सकाळच्या गर्दीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांना विलंबाचा सामना करावा लागला.
ओव्हरहेड वायरवरील बिघाडामुळे हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाल्याने शिवडीसह विविध स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली. लोकलच्या प्रतीक्षेत फलाटांवर प्रवाशांची मोठी रांग लागली होती. अचानक वाहतूक थांबल्याने प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, ओव्हरहेड वायरवर अडकलेला कपडा नेमका कुठून आला, तो कोणी फेकला की वाऱ्यामुळे उडून आला, याचा शोध घेण्याचे आव्हान रेल्वे प्रशासनासमोर आहे. यासाठी परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासण्याची शक्यता आहे.
मुलुंड – ठाणे स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावरील ओव्हरहेड वायरमध्ये इतर दुसरी तार अडकल्याने २६ ऑक्टोबर रोजी सकाळी लोकलचा खोळंबा झाला होता. सकाळी ९.२३ वाजता हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर दुरुस्तीसाठी सकाळी १० पासून ओव्हरहेड वायरचा ब्लॉक घेण्यात आला. या घटनेमुळे उपनगरी लोकलचे वेळापत्रक विस्कळीत झाले. तसेच रेल्वे मार्गालगतच्या परिसरातून कपडे, प्लास्टिक किंवा इतर वस्तू उडून ओव्हरहेड वायरमध्ये अडकण्याच्या घटना घडत असून, या घटना रोखण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासन काय उपाययोजना करणार, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
