१० सेवा रद्द, हार्बर सेवा अर्धा तास उशिराने; डंपरचालक फरार

दर दिवशी काही ना काही तांत्रिक बिघाडाने विस्कळीत होणारी हार्बर रेल्वेवरील सेवा गुरुवारी मात्र रेल्वेमार्गाबाहेरील गोष्टींमुळे कोलमडली. गुरुवारी दुपारी १.१०च्या सुमारास पनवेल आणि खांदेश्वर यांदरम्यान एक डंपर रेल्वे रूळ ओलांडण्याच्या प्रयत्नात असताना एका बाजूने लोकलला धडकला. या डम्परसह लोकलही अडकून पडल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक खोळंबली. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. हा बिघाड दुरुस्त होण्यासाठी ४० मिनिटांपेक्षा जास्त कालावधी लागल्याने या दरम्यान १० सेवा रद्द झाल्या. या अपघातामुळे संध्याकाळी उशिरापर्यंत हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने सुरू होती.

पनवलेहून ठाण्याला जाणारी लोकल दुपारी १.०४ वाजता निघाली. पनवेल आणि खान्देश्वर यांदरम्यान एका तळ्याचे काम सुरू होते. या कामावरील एक डम्पर बेकायदेशीरपणे रेल्वे रूळ ओलांडत असताना हा प्रकार घडला. खान्देश्वरच्या दिशेने जाणाऱ्या गाडीला हा डम्पर एका बाजूने धडकला. गाडी फारशी वेगात नसल्याने जीवित हानी झाली नाही. मात्र गाडीला धडकलेला डम्पर रेल्वेमार्गाजवळच अडकल्याने ही गाडीही तशीच उभी राहिली. या अपघातानंतर लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. डम्पर चालकाने घाबरून घटनास्थळावरून पळ काढल्याने हा डम्पर मागे घेणेही शक्य होत नव्हते. अखेर पोलिसांनी स्थानिकांच्या सहकार्याने एक जेसीबी यंत्र मागवून हा डम्पर बाजूला घेतला. हा डम्पर बाजूला होईपर्यंत पावणेदोन वाजून गेले. डम्पर बाजूला घेतल्यानंतर १.५२ वाजता गाडी खान्देश्वरच्या दिशेने रवाना झाली.

या अपघातादरम्यान हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील १० सेवा रद्द झाल्या. हार्बर तसेच ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक अर्धा ते पाऊण तास उशिराने धावू लागली. संध्याकाळी उशिराही हार्बर तसेच ट्रान्स हार्बर मार्गाची वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने सुरू होती.