मुंबई : तांत्रिक कामांसाठी रविवारी, २४ जुलैला हार्बर मार्गावर पनवेल – वाशीदरम्यान आणि पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रूझ – गोरेगावदरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील भायखळा – माटुंगादरम्यान जलद मार्गावर शनिवार, २३ जुलैच्या रात्री ११.३० पासून ब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे लोकल भायखळा ते माटुंगादरम्यान धिम्या मार्गावर धावतील.
पनवेल – वाशीदरम्यान रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सकाळी १०.३३ पासून दुपारी ३.४९ वाजेपर्यंत पनवेलहून सीएसएमटीला जाणाऱ्या आणि सीएसएमटीहून पनवेल, बेलापूरला सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ पर्यंत जाणाऱ्या लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच ठाणे – पनवेल या ट्रान्स हार्बरवरील दोन्ही मार्गावरील लोकल फेऱ्याही रद्द करण्यात आल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.
बेलापूर – खारकोपर आणि नेरुळ – खारकोपर लोकल सेवा सुरू राहील. सीएसएमटी – वाशी विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार असून ठाणे – वाशी, नेरुळ ट्रान्स हार्बर सेवाही सुरळीत असणार आहेत. पश्चिम रेल्वेवरही सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल. त्यामुळे सांताक्रूझ – गोरेगावदरम्यान जलद मार्गावरील लोकल धिम्या मार्गावरून चालवण्यात येतील.
मध्य रेल्वेवरील भायखळा – माटुंगादरम्यान दोन्ही जलद मार्गावर शनिवारी रात्रीपासून मेगा ब्लॉक घेऊन कामे करण्यात येणार आहेत. सीएसएमटी दिशेने जाणाऱ्या जलद मार्गावर शनिवारी रात्री ११.३० ते पहाटे ४.०५ वाजेपर्यंत आणि डाऊन जलद मार्गावर मध्यरात्री १२.४० ते पहाटे ५.४० वाजेपर्यंत ब्लॉक असेल.