प्रसाद रावकर
मुंबई : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या सभेसाठी झालेल्या गर्दीच्या पायाखाली शिवाजी पार्कचे मैदान घायाळ झाले आहे. पालिकेने मोठय़ा मेहनतीने समतोल केलेले मैदान काही ठिकाणी उखडले असून जवळपास ३० टक्के भागावरील गवत नष्ट झाले आहे. याबद्दल परिसरातील रहिवाशांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
करदात्यांनी पालिकेच्या तिजोरीत जमा केलेला निधी मैदानातील हिरवळ राखण्यासाठी किती वेळा खर्च करणार असा प्रश्न स्थानिकांनी केला आहे. तसेच मैदान वर्षभरात केवळ ४५ दिवस अन्य कार्यक्रमांसाठी देण्याकरिता नियमावली आखावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
गेल्या आठवडय़ात शिवाजी पार्क मैदानात मनसेची सभा पार पडली. सभेनिमित्त मैदानात साहित्य आणण्यासाठी वाहनांची ये-जा झाली. भव्य व्यासपीठ उभारण्यात आले. समर्थक, कार्यकर्त्यांसाठी आसन व्यवस्था म्हणून मैदानात खुच्र्या थाटण्यात आल्या. या सभेला झालेल्या गर्दीमुळे मैदानात बहरलेल्या हिरवळीला त्याचा फटका बसला. मैदानाचा काही भाग असमोतल झाला, तर काही भाग उजाड दिसू लागला आहे. याबद्दल स्थानिक रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पालिकेने मैदानातील जुनी माती काढून मुरुम टाकला आणि त्यावर सुमारे ४०० ट्रक मातीची भरणी केली. त्यावर गवताची लागवड केली. मैदानात गवताचा गालिचाही तयार झाला. मात्र राजकीय सभेनंतर मैदानातील काही भागातील
गवताची वाताहत झाली आहे. मैदानात वाहनांची ये-जा झाली होती. त्यामुळे मैदानाचे नुकसान झाले. परंतु त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात येईल, असे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
मैदानातील मेहनत मातीत
गवताची लागवड केली. मैदानात गवताचा गालिचाही तयार झाला. मात्र राजकीय सभेनंतर मैदानातील काही भागातील गवताची वाताहत झाली आहे. मैदानात वाहनांची ये-जा झाली होती. त्यामुळे मैदानाचे नुकसान झाले. परंतु त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात येईल, असे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोटय़वधी पाण्यात
या प्रकल्पावर चार कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. आता देखभालीसाठी तीन कोटी रुपयांचे कंत्राट देण्याचा घाट घालण्यात येत आहे, असा आरोप रहिवाशांनी केला आहे. मे महिन्यात मोठय़ा संख्येने मुले मैदानात खेळण्यासाठी येतील. त्यावेळी मैदानातील गवताची जपणूक कशी करणार, असा सवाल रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
खर्च वसूल करा
शिवाजी पार्क परिसरात राहणाऱ्या रहिवाशांनी मैदानाच्या वाताहतीचा खर्च संबंधित राजकीय पक्षांकडून वसूल करावा, अशी मागणी केली आहे. ‘मैदानातून उडणाऱ्या धुळीवर उपाययोजना करण्यासाठी वर्षां संचयन प्रकल्प उभारून स्प्रिंकलरच्या माध्यमातून पाण्याची फवारणी करणे गरजेचे आहे. मैदानात मातीची भरणी करू नये अशी मागणी रहिवाशांनी केली होती. पण ती धुडकावण्यात आली. आता मैदानाची वाताहत झाली आहे. करदात्यांचा पैसा किती वेळा मैदानावर खर्च करणार. मैदान २४ दिवस विविध कार्यक्रमांसाठी देण्याकरिता नियमावली तयार करावी. कोणत्याही परिस्थितीत मैदानात मातीची भरणी करण्यास परवानगी देऊ नये,’ असे मत पंकज दामनिवाला या रहिवाशाने व्यक्त केले.
मनसेचा पालिकेवर आरोप
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या नुकसानीला पालिका जबाबदार असल्याचा आरोप केला. ‘शिवाजी पार्कवर दररोज मोठय़ा संख्येने खेळण्यासाठी मुले येत असतात. त्यामुळे तेथे गवत टिकाव धरू शकणार नाही. याबाबत आम्ही सूचनाही केली होती. मात्र तरीही मैदानात गवत लावण्यासाठी दोन कोटी ९४ लाख रुपयांची निविदा मागविण्यात आली होती. आता गवताची वाताहत झाली असेल तर मैदानात ते लावण्याची कल्पना मांडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वेतनातून त्याचा खर्च कापून घ्यावा,’ असे ते म्हणाले.

आधी पुढाकार, आता विरोध
शिवाजी पार्क मैदानात सुरू असलेल्या खेळांमुळे उडणाऱ्या मातीच्या धुळीचा या परिसरात राहणाऱ्या तसेच फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास होतो. त्यामुळे काही वर्षांपूर्वी मनसेच्या पाठपुराव्यानंतर पालिकेने या मैदानात गवत उगवण्यासाठी पाणीपुरवठा व्हावा याकरिता वर्षां संचय प्रकल्प उभारले. मात्र देखभालीअभावी या प्रकल्पाची वाताहत झाली. त्यानंतर पालिकेनेच मैदानात ३६ विहिरी उभारून पावसाचे पाणी त्यात साठविण्याचा नवा प्रकल्प आखला. मातीची भरणी करून मैदान समतोल करणे आणि धूळ उडू नये यासाठी गवताची हिरवळ निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मैदानातील काही भागातील माती काढून मुरुम टाकण्यात आला. त्यावर लाल माती आच्छादून गवताचे बी पसरण्यात आले. नियमित पाणी फवारणीने मैदान हिरव्यागार मैदानाने आकर्षक बनू लागले होते.