पिशवीवरील ‘हरी ओम ड्रॅग गोरेगाव’ उल्लेखावरून आरोपीचा शोध ; माहीम घटनेची पोलिसांकडून १० तासांत उकल 

मुंबई रेल्वे पोलीस गुन्हे अन्वेषण विभागाने १० तासांत गुन्ह्याची उकल करून आरोपी विकास खैरनारला अटक केली.

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील माहीम ते माटुंगा रोड रेल्वे स्थानकांदरम्यान महिलेचे धड आणि डोके असे दोन तुकडे केलेला मृतदेह आढळला होता. मृतदेह ठेवलेल्या प्लॅस्टिकच्या पिशवीवरील ‘हरी ओम ड्रॅग गोरेगाव’ या उल्लेखावरून या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले.

मुंबई रेल्वे पोलीस गुन्हे अन्वेषण विभागाने १० तासांत गुन्ह्याची उकल करून आरोपी विकास खैरनारला अटक केली.  माहीम रेल्वे स्थानकादरम्यान मंगळवारी सकाळच्या सुमारास प्लॅस्टिकच्या पिशवीत कोंबलेला मृतदेह एका महिलेला सापडला होता. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाची माहिती घेण्यास सुरुवात केली. महिलेच्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी तिचे छायाचित्र व माहिती त्वरित मुंबई शहर पोलीस आयुक्तालय व लगतच्या पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीतील पोलीस ठाण्यांना पाठवली.

मृतदेह ठेवलेल्या प्लॅस्टिकच्या पिशवीची पोलिसांनी तपासणी केली असता त्यावर ‘हरी ओम ड्रॅग गोरेगाव’ असा उल्लेख आढळला. तात्काळ पोलिसांचे एक पथक गोरेगाव परिसरात पाठविण्यात आले. िदडोशी पोलीस ठाण्यात २३ मे रोजी एक महिला हरविल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. पोलिसांनी खातरजमा करून हा मृतदेह गोरेगाव पूर्व परिसरात राहणारी सारिका चाळके हिचा असल्याचे उघडकीस आले.

या प्रकरणी तक्रार दाखल करणाऱ्या तिच्या पतीची चौकशी करण्यात आली. तसेच तिच्या कामाच्या ठिकाणी तपास करण्यात आला. पोलिसांकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणही तपासण्यात आले.  सारिका चाळके गोरेगाव येथे वास्तव्यास होती आणि सॅटेलाईट टॉवरमध्ये हाऊस कीपिंगचे काम करीत होती. आरोपी विकास खैरनार गोरेगाव येथे वास्तव्यास असून तो त्याच ठिकाणी काम करीत होता. खैरनारवर संशय आल्याने पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. त्यानंतर खैरनारने गुन्ह्याची कबुली दिली. 

सारिका चाळके आणि विकास खैरनार यांचे जवळचे संबंध होते. सारिकाला दिलेले उसने पैसे तिने परत केले नाहीत. ती आपला चारचौघात वारंवार अपमान करीत होती. त्यामुळे रागाच्या भरात २३ मे रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास सॅटेलाईट टॉवरच्या शौचालयात सारिकाचा गळा चिरून हत्या केली. मृतदेह प्लॅस्टिकच्या पिशवीत कोंबून रिक्षाने गोरेगाव रेल्वे स्थानकापर्यंत आणला. चर्चगेटला जाणाऱ्या धीम्या लोकलमध्ये मृतदेह ठेवला. माहीम रेल्वे स्थानकादरम्यान मृतदेह रेल्वेतून फेकून दिला, असे विकासने पोलीस चौकशीत सांगितले. या गुन्ह्याचे घटनास्थळ दिंडोशी पोलीस ठाणे हद्दीत असून संपूर्ण प्रकरण दिंडोशी पोलीस ठाण्यात वर्ग केले आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Hari om drug goregaon on plastic bag clue help police to sove murder case zws

Next Story
म्हाडा सोडतीसाठीच्या उत्पन्न मर्यादेत बदल; अत्यल्प गटासाठी आता वार्षिक ६ लाख तर अल्प गटासाठी ६ लाख ते ९ लाख रुपये मर्यादा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी